भंडारा जिल्ह्यातील एसटी महामंडळ विभागातील पदांच्या भरतीसाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेतली.
भंडारा आणि गोंदिया हे विदर्भाच्या हृदयातील दोन जिल्हे अनेक वर्षांपासून विकासाच्या गाडीत मागे पडले होते. रस्त्यांची अपुरी सोय, शेतकऱ्यांच्या समस्या, अपुऱ्या रोजगाराच्या संधी आणि शासन दरबारी वारंवार दुर्लक्षित राहिलेली मागणी. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा भाग कायमच मागासलेला मानला गेला. मात्र गेल्या काही वर्षांत या मागासलेपणाला काहीसा ब्रेक बसला आणि त्यामागे एक महत्त्वाचा चेहरा उभा राहिला. हा चेहरा म्हणजे भाजपचे विद्यमान नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. डॉ. फुके यांनी आपल्या राजकीय प्रवासात विकास हीच प्राथमिकता ठेवत भंडाऱ्याला वेग दिला.
डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते रस्ते आणि शिक्षण यंत्रणेपर्यंत अनेक मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवला. निवेदन देणे, मंत्रालयात पाठपुरावा करणे, निधी मिळवून देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासन दरबारी भंडाऱ्याचा ठोस आवाज बनणे, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. डॉ. फुके यांचा हा पुढाकार पुन्हा एकदा दिसून आला. जेव्हा त्यांनी एस.टी. महामंडळातील रखडलेली भरती प्रक्रिया लवकर मार्गी लावण्यासाठी थेट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. 2019 मध्ये भंडारा विभागात चालक व वाहक पदासाठी 406 जागांची भरती जाहिर करण्यात आली होती.
युवांसाठी नवी संधी
जाहीर करण्यात आलेल्यामध्ये 330 उमेदवार पात्र ठरले असताना, आजवर केवळ 284 उमेदवारांचीच निवड झाली आणि46 उमेदवार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या उमेदवारांच्या न्यायहक्कासाठी आवाज बनत, डॉ. फुके यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्या दालनात एका विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत रखडलेल्या निवड प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली. मंत्री सरनाईक यांनी या विषयात सकारात्मक हस्तक्षेप करीत, लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ठाम आश्वासन दिले.
मंत्र्यांची ही बैठक आणि त्यामागील तयारी हे फक्त एका भरती प्रक्रियेचे प्रकरण नाही. हे एक उदाहरण आहे की, जर लोकप्रतिनिधीने खंबीर भूमिका घेतली, तर प्रशासनालाही उत्तर द्यावंच लागतं. डॉ. फुके यांनी यापूर्वीही पायाभूत सुविधांपासून ते रोजगार निर्मितीपर्यंत विविध मुद्द्यांवर ठोस कामगिरी केली आहे. त्यांनी भंडाऱ्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच अनेक रखडलेली प्रकल्पं मार्गी लागली आहेत.भंडाऱ्यातील युवकांसाठी ही भरती संधी म्हणजे रोजगाराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे केवळ 46 उमेदवारांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांनाही नवा दिलासा मिळू शकतो.