प्रशासन

Bhandara : ज्ञानाच्या मंदिरात शालार्थ घोटाळ्याची काळी सावली

Teacher Recruitment Scam : भंडाऱ्यात मुख्याध्यापकासह तिघे जेरबंद

Post View : 25

Author

महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळ्यात एक हजाराहून अधिक बनावट शिक्षकांची भरती झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक झाली आहे.

राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या भिंती हादरल्या आहेत. शाळेत ज्ञान देणारे शिक्षक खरेच शिक्षक आहेत का? या प्रश्नाने आता प्रत्येक पालकाचा चेहरा काळवंडला आहे. शालार्थ आयडीच्या बनावट वापरातून घडलेला हा भयंकर घोटाळा केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यावर नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या प्रामाणिकतेवरच घाला घालणारा ठरतोय. 2019 ते 2025 सहा वर्षांत तब्बल 1 हजार 56 बनावट शिक्षक राज्यातील विविध शाळांमध्ये नकली प्रमाणपत्रांवर रुजू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तकं द्यायची सोडून या बनावट शिक्षकांनी त्यांच्या भविष्याशी थेट सौदा केला आहे.

राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकरणात गुरुवारी (26 जून रोजी) भंडारा जिल्ह्यातून आणखी तिघांना अटक झाली. विशेष म्हणजे, या बोगस शिक्षकाच्या घरातून मिळालेल्या कागदपत्रांवरून ही संपूर्ण साखळी उघडकीस आली. तपासात समोर आले की, महेंद्र महेशकर या बोगस शिक्षकाकडे वेगवेगळ्या शाळांच्या नियुक्ती संदर्भातील बनावट दस्तऐवज मिळाले. या कागदपत्रांमध्ये भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील विनोद हायस्कूल या शाळेचेही नाव समोर आले. याच आधारे पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक चेतक डोंगरे, तत्कालीन सचिव गंगाधर डोंगरे आणि शिक्षक सदानंद जांगडे यांना चौकशीसाठी बोलावले आणि लगेच ताब्यात घेतले.

Chandrashekhar Bawankule : विचारांचा विषवृक्ष उपटणारे विधेयक 

प्रशासनावर काळा डाग

शुक्रवारी या तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार आजी-माजी शिक्षण उपसंचालक, आठ कर्मचारी आणि चार शाळा संचालकांसह तब्बल 18 जणांना अटक झाली आहे. पोलिसांचा तपास सांगतो की, हे फक्त वरचं पान आहे. शिक्षणाधिकारी, क्लार्क, वेतन अधीक्षक यांच्या मूक संमतीने किंवा थेट दुर्लक्षामुळेच हे बनावट आयडी सहजपणे मिळत होते. तपास अधिक खोलात गेल्यावर 650 पेक्षा जास्त शिक्षकांची भरती बोगस असण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे. या घोटाळ्याच्या धागेदोरे राज्यभर विखुरले आहेत.

शाळांमध्ये शिकवण्यासाठी नियुक्त केलेले हे बनावट शिक्षक शालार्थ आयडीच्या फसव्या प्रक्रियेतून थेट वर्गखोल्यांमध्ये पोहोचले. कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता, नियम धाब्यावर बसवत ही भयंकर साखळी उभी राहिली. या सगळ्या प्रकारातून स्पष्ट होते की, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही भ्रष्टाचाराचा नापाक हात पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचं पुस्तक नव्हे, तर बोगस शिक्षकांकडून फसवणुकीचा धडा दिला जात आहे. त्यामुळे पालकांच्या मनात एकच प्रश्न पेटतोय आपल्या मुलांचं भविष्य कोणाच्या हाती?हा घोटाळा केवळ शिक्षक भरतीपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण प्रशासन, शिक्षण खातं आणि शासनाच्या पारदर्शकतेवरच मोठा काळा डाग आहे.

Balbharati : संविधानाच्या पानांवर पंथ निरपेक्षतेची शाई

भविष्यातील डॉक्टर, इंजिनीअर, प्रशासन अधिकारी तयार करणाऱ्या शाळांमध्ये जर बनावट शिक्षक असतील, तर पुढच्या पिढीचं काय होणार?हे प्रकरण केवळ भंडाऱ्यापुरतं सीमित नाही, तर राज्याच्या कानाकोपऱ्यात याची पाळेमुळे पसरलेली आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे. समोर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!