
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर श्रीराम नवमीचा उत्सवही अकोल्यात पार पडला. लवकरच भाजपच्या कार्यकारिणीत बदल होणार आहे. त्यानंतर अकोल्यात मोठ्या धिंगाण्याला सुरुवात होणार आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अकोल्यात भाजपला बऱ्यापैकी फटका सहन करावा लागला. विशेषत: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तर भाजपचे पानीपत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अकोल्यता येऊन गेले. ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला गेला. ‘एक है तो सेफ है’ असं आवाहन केलं गेलं. तरीही अकोल्याच्या जनतेनं भाजपकडे पाठ फिरवली. आता लवकरच या सगळ्याला बदला काढला जाणार आहे.

अकोल्यात श्रीराम नवमी मिरवणुकीत भाजपचे अनेक नेते काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या व्यासपीठावर दिसले. या सगळ्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. साजिद खान हेच अकोल्यातील हिंदू-मुस्लिम दंगलीला कारणीभूत आहे, असा आरोप भाजपकडून होत आहे. मात्र केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असतानाही साजिद खान यांच्या विरोधात एकही पुरावा सरकार, सरकारी वकील आणि पोलिसांना गोळा करता आला नाही. त्यामुळं साजिद यांना भाजपकडूनच छुपा पाठिंबा तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. आता या सगळ्या चर्चा श्रीराम नवमी उत्सवानंतर पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.
Belora Airport : देवाभाऊंच्या उपस्थितीत अमरावतीच्या आकाशात पूर्ण वेळ टेकऑफ
तमाशाची प्रतीक्षा
साजिद यांना दंगलीचा व्हिलन ठरविणारे भाजपचे नेते श्रीराम नवमी उत्सवात त्यांच्याच व्यासपीठावर होते. आतापर्यंत महापालिकेतील काही ताकदवान नेते साजिद यांच्या पाठिशी होते. या नेत्यांनी साजिद यांना अनेक प्रकारच्या परवानगी मिळवून देण्यात मोलाची मदत केली. आजही ही मदत पडद्यामागून सुरुच आहे. मात्र यासगळ्याकडे दुर्लक्ष करून विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात काम करणाऱ्यांना आता शिक्षा भोगावी लागणार आहे. भाजपमध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी फेरबदल होणार आहे. कार्यकारिणी बदल करून शहराध्यक्ष पद आपल्याकडे यावे यासाठी एका नेत्यानं मोठी फिल्डिंग लावली आहे.
भाजपचे शहराध्यक्षपद हाती आल्यानंतर हा नेता फक्त हाती कात्री घेऊन बसणार आहे. महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुकांना उमेदवारी देण्याचे अधिकार आपल्याला द्यावे, असा याचा हट्ट आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपशी दगा करणाऱ्यांना उमेदवारी नाकारून शिक्षा करतो, असा युक्तीवाद यामागं या नेत्यानं केला आहे. मात्र मुळात वस्तुस्थिती तशी नाही. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांची उमेदवारी नाकारत व्यक्तीगत सूड उगविण्याची ‘सोची समझी साजिश’ रचली गेली आहे. मात्र या सगळ्यात भाजपमध्ये मोठा तमाशा बघायला मिळण्याची चिन्हे आहेत.
Parinay Fuke : तस्कर, अधिकाऱ्यांवर येत्या काही तासात कारवाई; सीएमचे आदेश
मोठ्या नेत्यांचे समर्थक
अकोला भाजपमधील अनेक पदाधिकारी थेट मोठ्या नेत्यांचे समर्थक आहेत. काही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शिष्य आहेत. काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट संपर्कात असतात. या सगळ्यांचाच ‘खतना’ करण्याचा बेत तयार केला जात आहे. महापालिका निवडणूक जसजसी जवळ येईल, तसतसे हे चित्र स्पष्ट होत जाणार आहे. मात्र त्याची तयारी आतापासूनच झाली आहे. श्रीराम नवमी शोभायात्रा समिती आणि त्यातील पदाधिकाऱ्यांमुळेच भाजपला फटका बसल्याचे काही पुरावे वरपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. यावर भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवला तर महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा राडा अकोला भाजपमध्ये बघायला मिळू शकतो.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं अशा कोणत्याही एकतर्फी ‘कानभरो’ गोष्टींवर विश्वास ठेऊ नये, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. वस्तुस्थितीच्या आधारावर योग्य निर्णय न झाल्यास भाजपचा उरलासुरला बुरूज पाडायला काँग्रेस आणि महाविकास आघाडीला वेळ लागणार नाही. त्यामुळं अकोल्यातून भाजपचं अस्तित्व आपल्या हातून संपवाचं की योग्य लोकांच्या हाती नेतृत्व देऊन भाजपला अधिक मजबूत करायचं याचा निर्णय आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाच घ्यावा लागणार आहे.
Harshwardhan Sapkal : कुठे गेलेत सेलिब्रिटी? काँग्रेसचा संतापाचा पारा
संघाचंही ऐका
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वस्तुस्थितीजन्य माहिती भाजपला दिली होती. मात्र भाजप हट्टाला पेटली. त्याचे परिणाम काय झाले, हे आता दिसत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपनं पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वासात घेणं गरजेचं आहे. एखाद्या नेत्याचा व्यक्तीगत स्वार्थ असू शकतो परंतु संघाचे तसे नाही. चुकीच्या माणसांना संघाने कधीही मोठं केलेलं नाही. दुटप्पी हिंदुत्ववाद्यांना तर संघ कधीच पाठिशी घालत नाही. त्यामुळं भाजप आणि संघ यांनी यंदा एकत्रितपणे अकोल्याच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा होत आहे. यंदा असं झालं नाही तर भाजपला त्याचा मोठा फटका बसेल. मात्र त्याची शिक्षा सामान्य अकोलेकरांना भोगावी लागेल यात दुमत नाही.
केवळ पक्ष म्हणून भाजपनं किमान यंदा तरी चुकीच्या लोकांच्या पाठिशी उभे राहा अशी गळ मतदारांना घालू नये अशी अपेक्षा होत आहे. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कट्टर हिंदुत्ववादी नेते आल्यावरही मतदारांनी का पाठ फिरवली याचं उत्तर स्पष्ट आहे. त्याचे कारण म्हणजे भाजपची ‘चॉइस’च चुकली होती. त्यामुळे आपण निवडू तेच अस्सल आणि हॉलमार्क असलेलं सोनं आहे, या विचारातून भाजपनं महापालिका निवडणुकीपूर्वी बाहेर पडावं, अशी मागणी आता होत आहे. शेवटी निर्णय भाजपलाच घ्यायला आहे. पक्षाचं कल्याण करायचं की सत्यानाश हे त्यांनाच ठरवायचं आहे, अशी चर्चा अकोल्यात आहे.