महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रासाठी ही गुंतवणूक अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील विकास कामांसाठी या गुंतवणुकीद्वारे मदत होणार, असं फडणवीस म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. गुंतवणुकीच्यादृष्टीने हा दौरा महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे 20 जानेवारी सोमवार रोजी रात्री उदघाटन झाले. त्यानंतर 21 जानेवारी मंगळवार रोजी पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत.
गुंतवणूक करण्यात आलेल्या 4 लाख 99 हजार 321 कोटी रुपयांमधून 92,235 इतकी रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटी रुपयांचा आहे. हा करार जेएसडब्ल्यू बरोबर करण्यात आलेला आहे. हा करार स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. हा करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा असल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
गडचिरोलीला मिळणार Development बुस्ट
दावोसमध्ये झालेला सर्वात पहिला करार गडचिरोली जिल्ह्यासाठी झालेला आहे. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. या कराराअंतर्गत 5 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून चार हजार जणांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान दावोसमध्ये झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांबरोबर झाले. लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.
महाराष्ट्राच्या विकासाला गती प्रदान करणारी हे गुंतवणूक असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर करण्यात आलेल्या गुंतवणुकीमध्ये सर्वप्रथम गुंतवणूक ही विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे. या गुंतवणुकीद्वारे गडचिरोली जिल्हा प्रगतिशील होणार, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
अशाप्रकारे गुंतवणूक
जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
नागपूर/गडचिरोली
गुंतवणूक : 3,00,000 कोटी
रोजगार : 10,000
वारी एनर्जी
नागपूर
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : 30, 000 कोटी
रोजगार : 7200
कल्याणी समूह
गडचिरोली
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : 5,200 कोटी
रोजगार : 4000
