
नुकत्याच मुंबईत मराठी भाषेवरून झालेल्या वादात बिहारी नागरिकांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणावर बिहारचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या विषयाला जोरदार चाव दिला आहे. त्यांनी विविध ठिकाणी आंदोलनं, मोर्चे आणि उपक्रम राबवत मराठी भाषेचा आग्रह धरला आहे. मनसेच्या या आंदोलनाने हिंसक वळणही घेतले. बिहारच्या काही लोकांना मराठी येत नसल्याने थेट मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर बिहारचे माजी आयपीएस आणि हिंदू सेना या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाचे संस्थापक शिवदीप लांडे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे

लांडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, दिवसरात्र मेहनत करून जे लोक पोटाची खळगी भरतात, त्यांनाच मारहाण होते. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींवर असे हल्ले होत नाहीत, कारण गरिबांवर हात उचलणे सोपे जाते. त्यांनी राज्य सरकारवर आणि कायदा अंमलबजावणी संस्थांवरही प्रश्न उपस्थित केला की, हे थांबवण्यासाठी पावले का उचलली जात नाहीत? शिवदीप लांडे म्हणाले की, माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्र माझं गृहराज्य आहे. पण मी गेली अनेक वर्षे निःस्वार्थपणे बिहारच्या जनतेची सेवा केली आहे. मी कर्माने बिहारी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.
गरिबांवर अन्याय
लांडे यांनी इशारा दिला की, जर आमची हिंदू सेना बिहारमध्ये सरकार स्थापन करेल, तर कोणत्याही कोपऱ्यात जर बिहारी व्यक्तीवर हल्ला झाला, तर त्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. गरिबांवर अन्याय सहन केला जाणार नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पवई परिसरात एका खाजगी सुरक्षा रक्षकावर मराठी न बोलल्याच्या कारणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. एल अँड टी इमारतीबाहेर भवानीप्रसाद अनिरुद्ध नावाच्या गार्डचा अजिंक्य नावाच्या स्थानिकाशी वाद झाला.
वादादरम्यान गार्डने मराठी गेला तेल लेने अशी टिप्पणी केल्याचे सांगितले जाते. या विधानाने उपस्थित मनसे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी गार्डवर हात उचलला. या प्रकरणामुळे शहरात मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. सरकारी कार्यालयांपासून ते बँकांपर्यंत मराठीतच संवाद व्हावा, असा आग्रहदेखील मनसेने लावला आहे. मात्र या मागण्या आता सामाजिक सलोख्यावर परिणाम करताना दिसत आहेत. मराठी भाषेचा आग्रह हिंसक वळण घेत आहे. परराज्यांतून आलेल्या लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.
महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मुद्दा एकीकडे उभा राहत असतानाच, त्याच्या छायेत वाढणारा प्रांतवाद आणि सामाजिक तणाव नक्कीच चिंताजनक आहे. भाषेची रक्षा करताना माणुसकीचा गळा घोटला जातोय का, हा प्रश्न आता समोर येतोय.