महाराष्ट्र

Maharashtra BJP : भाजपने दरवाजे उघडले, पण घरात वादळ शिरलं

Chandrashekhar Bawankule : चमकोगिरी करणाऱ्यांना मिळणार नाही तिकीट

Author

भाजपच्या ‘सर्वांसाठी खुले’ धोरणाने एक नवा वाद जन्माला घातला आहे. हकालपट्टी झालेल्या बडगुजरांच्या जलद पक्षप्रवेशावरून पक्षातच मतभेदांच्या ठिणग्या उडाल्या आहेत.

सत्ताधारी पक्षातील दरवाजे सध्या खूपच हालचाल करीत आहेत. एकीकडे सर्वांसाठी खुले असल्याचा जाहीरनामा, तर दुसरीकडे ‘हा कोणी घरचा नाही’, म्हणत उठणारा विरोध. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून बाहेर फेकले गेलेले सुधाकर बडगुजर आता भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात हलचल निर्माण केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चांना अधिक बळ देत सांगितले की, पक्षवाढीसाठी आमची दारे सर्वांसाठी खुली आहेत.

शिवसेनेने 4 जून बुधवारी बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करताना त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला होता. त्याच 24 तासांच्या आत भाजपकडून त्यांच्यासाठी दारे उघडली गेली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट संकेत देत सांगितले की, बडगुजरसारख्या लोकांसाठी आमचा पक्ष सदैव तयार आहे. विशेष म्हणजे, बडगुजर यांनी याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भाजपकडे झुकणारी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र स्थानिक भाजप नेत्यांमध्ये त्यांच्या प्रवेशाबाबत तीव्र मतभेद आहेत. काहींनी याला उघडपणे विरोध केला असतानाही, बावनकुळे यांनी अखेर ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. बडगुजर यांच्या प्रवेशाची धुरा केंद्रीय मंत्री गिरीश महाजन स्वतः सांभाळत आहेत.

Archit Chandak : एक महिना द्या; ट्रॅफिक होईल जामिंग फ्री

प्रदेशाध्यक्षांचा इशारा

बावनकुळे यांनी स्पष्ट इशारा दिला की, नेत्यांच्या मागे पुढे चमकोगिरी करणाऱ्यांना आता तिकीट मिळणार नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना भाजपच्या 11 वर्षांतील कामगिरीची उजळणी करून ती थेट जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 15 ऑगस्टच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कसून तयारीला लागावे. भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश हे काहींसाठी विकासाचं चिन्ह असलं, तरी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांना तो डोकेदुखी वाटतो आहे. त्यांनी बडगुजर यांचा जोरदार विरोध करत पक्षश्रेष्ठींना धक्का देणारे आरोप केले आहेत.

सीमा हिरे म्हणतात, मी स्वतः दोन वेळा बडगुजरांविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला, नेत्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं, आणि खुद्द बावनकुळे यांच्याविरोधात चुकीची माहिती पसरवली होती. त्यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मुलावरही गोळीबाराचा गुन्हा आहे. एवढंच काय, त्यांच्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Akola : दलित वस्ती निधीवर सावरकर-देशमुख यांच्यात घमासान

नेत्यांमध्ये खदखद

राजकीय वर्तुळात एक चर्चा जोर धरते आहे की, बडगुजर भाजपमध्ये केवळ राजकीय कार्यासाठी नव्हे तर स्वतःवरच्या आरोपांपासून संरक्षणासाठी येत आहेत का? त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला ‘राजकीय वजन’ वाढेल की ‘गुन्हेगारीचा भार’? भाजपच्या दरवाजे सर्वांसाठी खुले या धोरणाचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाचं, हे येणारा काळच ठरवेल. सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश एकीकडे भाजपच्या विस्तारवादी रणनीतीचा भाग वाटतो. तर दुसरीकडे स्थानिक नेतृत्वाच्या अस्वस्थतेचे कारणही ठरतो आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!