
अकोला भाजपमध्ये गटबाजी, धमक्या आणि नाराजीचे वातावरण ढवळून आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा अकोलात दौरा पार पडला. कार्यकर्त्यांमध्ये नव्याने ऊर्जा भरण्याच्या उद्देशाने त्यांनी थेट संवाद साधला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. अकोल्यात पश्चिम विदर्भातील भाजप संघटनात्मक आढावा घेण्यासाठी आलेल्या चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्ष सर्वांना सोबत घेऊन कार्यरत आहे आणि सामाजिक दायित्व म्हणून सत्तेचा उपयोग जनतेच्या प्रश्नांसाठीच व्हायला हवा, असे म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ वगळता इतर तीन मतदारसंघांतील विजयाची परंपरा कायम ठेवली. भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्षपदाचा फेरबदल आगामी नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक मजबूत करण्यासाठीचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे या दोन्ही पदांवर कसलेल्या आणि मुरब्बी पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पदासाठी सक्षम दावेदार कोण, नेमकी कोणाची निवड केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु यावर रवींद्र चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
नाट्यमय वातावरण
रवींद्र चव्हाण यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उफाळलेल्या अंतर्गत वादाला नवीनच वळण मिळाले आहे. अकोला शहर भाजपमध्ये सध्या एका सरचिटणीसाच्या वागणुकीमुळे नाराजीचे वातावरण पसरले आहे. एका वरिष्ठ नेत्याच्या पाठिंब्याचा दावा करत या सरचिटणीसाने कार्यकर्त्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी पैसे आणि ओळखीचा वापर झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
चव्हाण यांचा अकोला दौरा भाजपला नवसंजीवनी देण्याची संधी ठरू शकतो, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे. अनेकांनी अशी मागणी केली आहे की, चव्हाण यांनी फक्त निवडक लोकांवर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी पावले उचलावीत. ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले, त्यांच्या भावना समजून घेत पक्षाला नव्या जोमाने उभं करावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
जोरावर खेळ
सध्या अकोल्यात भाजपमध्ये गटबाजीचं वातावरण निर्माण झालं असून, काही मोजक्या कार्यकर्त्यांना व्हीआयपी पासेस, स्वागताच्या विशेष संधी आणि पद देण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे. पैसे मागणाऱ्या आणि पक्षनिष्ठेचा अभाव असलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
अकोल्यात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची घसरण सुरू झाली असून काँग्रेसची ताकद वाढताना दिसते आहे. काही हिंदू मतदार देखील काँग्रेसकडे झुकत असल्याचे निरीक्षण आहे. अशा परिस्थितीत भाजपने अंतर्गत वाद मिटवून संघटना बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले नाही तर महापालिका निवडणुकीत मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.