महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना, भाजपने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभाग रचनेचा नकाशा समोर आल्यानंतर राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने (भाजप) देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या रणसंग्रामात नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता पदवीधर मतदारसंघात ते बाजी मारणार का, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. भाजपने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. संभाजीनगरसाठी आमदार संजय केनेकर, पुण्यासाठी राजेश पांडे आणि नागपूरसाठी सुधाकर कोहळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुधाकर कोहळे यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. नागपूरच्या राजकीय रणभूमीत कोहळे यांचे नाव कायम चर्चेत राहिले आहे. त्यांच्या खणखणीत वक्तृत्वाने आणि संघटन कौशल्याने ते पक्ष कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
Maratha Reservation Controversy : कुणबी प्रमाणपत्राचे दार होणार बंद?
संघटनात्मक तयारी जोरात
आता पदवीधर मतदारसंघात त्यांना पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2024 निवडणुकीत सुधाकर कोहळे यांना काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तरीही, कोहळे यांनी हार मानली नाही. नागपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत भाजपची ताकद कायम असल्याचा दावा त्यांनी ठामपणे केला होता. महायुती आहे, पण नागपूरमध्ये भाजपचाच बोलबाला आहे. शिंदे गटाचा एकही आमदार नाही, अजित पवार गटाचा सरपंचही नाही, असे चिमटे काढत त्यांनी पक्षाची ताकद दाखवली होती. आता पदवीधर मतदारसंघात त्यांना नव्याने संधी मिळाली आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला ते पात्र ठरतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सुधाकर कोहळे यांच्यासाठी ही निवडणूक केवळ राजकीय लढाई नाही, तर स्वत:च्या नेतृत्वाला पुन्हा सिद्ध करण्याची एक संधी आहे. नागपूरच्या पदवीधर मतदारसंघात त्यांनी सदस्य नोंदणी मोहिमेची जबाबदारी घेतली आहे. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट करण्यास सुरुवात केली आहे. कोहळे यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील त्यांचा जनसंपर्क हे त्यांचे मोठे हत्यार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये भाजपचा झेंडा पुन्हा एकदा फडकणार का, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली कोअर कमिटीच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघानिहाय आढावा घेतला जात आहे. वॉर्डनिहाय पक्षाची ताकद, महायुतीची एकजूट आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीचा अंदाज घेतला जात आहे. कमकुवत वॉर्डमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सदस्य नोंदणीवर विशेष भर दिला जात आहे. मुंबईत स्वबळावर लढण्याची तयारी आणि महायुतीच्या एकजुटीचा पर्यायही भाजपने खुला ठेवला आहे.
