दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपने जोरदार विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि ‘आप’चा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाने मोठ्या ताकदीने सत्ता हस्तगत केली आहे. तब्बल 48 जागांवर विजय मिळवत भाजपाने अडीच दशकांनंतर दिल्लीत पुनरागमन केलं आणि सत्ता आपल्या हाती घेतली. दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पक्ष राहिला, मात्र 22 जागांवरच समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का काँग्रेसला बसला आहे. कारण पक्षाच्या झोळीत एकही जागा पडली नाही. त्यानंतर आता भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
विशेष म्हणजे, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष असूनही निवडणूक स्वतंत्रपणे लढले. याचाच परिणाम त्यांच्या पराभवावर झाला. दोन्ही पक्षांची मतं विभागल्याने भाजपाला थेट फायदा झाला. आता इंडिया आघाडीतल्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी काँग्रेस आणि ‘आप’ने एकत्र येणं गरजेचं होतं, असा सूर लावला आहे. तर काहींनी या पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्यास सुरुवात केली आहे.
सत्ता स्थापन करू शकतो लक्षात आल्यानंतर Uddhav Thackeray यांनी बदलला रंग
स्पष्ट निती नाही
दिल्लीतील निकालानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः काँग्रेसच्या ऐतिहासिक पराभवावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या दुर्दशेवर तिखट शब्दांत भाष्य केलं.
“काँग्रेसकडे कोणतीही स्पष्ट नीति नाही, पक्षाची दिशा ठरलेली नाही, आणि जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे 2047 पर्यंत काँग्रेस संपूर्णपणे हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य करत बावांकुळेंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, “आज देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो विकासाचा रोडमॅप तयार केला आहे, त्याच्याच दिशेने राष्ट्र पुढे जाईल. काँग्रेस आता लोकांच्या मनातून पुसली गेली आहे.
अनेक दिग्गजांचा पराभव
दिल्लीच्या सत्तेत 2015 पासून निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या आम आदमी पक्षाला या निवडणुकीत मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागलं आहे. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झाला आहे. एवढंच नव्हे, तर त्यांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
2015आणि 2020 मधील निवडणुकीत आम आदमी पक्षाने दिल्लीत झंझावाती विजय मिळवत भाजपाला आणि काँग्रेसला नामोहरम केलं होतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत परिस्थिती पूर्णपणे बदलली. आपच्या लोकप्रियतेत घट झाली. तर भाजपाने प्रभावी मोहीम राबवत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
जनतेचा विश्वास कमी
राजकीय विश्लेषकांच्या मते, आम आदमी पक्षाची सत्ता गेल्याचं हे संकेत आहेत की, दिल्लीतील जनतेचा पक्षावरील विश्वास कमी झाला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, प्रशासनातील त्रुटी, आणि पक्षांतर्गत वाद यामुळे जनता अस्वस्थ होती, ज्याचा परिणाम निकालावर दिसून आला.
भाजपाच्या या दणदणीत विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. तर आम आदमी पार्टीच्या पराभवामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
