महाराष्ट्र

Girish Joshi : डास चावतात म्हणून मनपा आयुक्तांच्या अंगणात झोपणार

Akola BJP : अकोला महानगरपालिकेला इशारा

Post View : 40

Author

एखाद्याला रात्री झोप येत नसेल तर त्यानं काय करावं? बरेच लोक मोबाइल पाहातात. काही गप्पा मारतात. काही ‘नाइट आऊट’ करतात. पण अकोल्यातील भाजपच्या माजी नगरसेवकानं लोकांसह मनपा आयुक्तांच्या अंगणात जाऊन झोपण्याचा बेतच तयार केला आहे.

अकोला शहरातील नागरिकांची अनेक कारणांमुळं झोप उडते. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळं लोकांची झोप रात्रीअपरात्री खराब होते. कधी कधी पहाटेच नळाला पाणी येत असल्यानं झोप अर्धवट सोडावी लागते. हाती गुंड, बादल्या घेऊन अकोलेकरांना धावपळ करावी लागते. दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला तर डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो. त्यासाठी रात्रीची झोप खराब करावी लागते. पण हल्ली एका वेगळ्याच कारणामुळं अकोलेकरांचा डोळ्याला डोळा लागेनासा झाला आहे.

पुरेशी झोप नसेल तर माणसाचा दुसरा दिवस खराब जातो. अर्धवट झोपेमुळं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होता. परंतु अकोलेकरांच्या साखरझोपेत दररोज मिठाचा खडा पडत आहे. प्रशासनाला मात्र याचं काहीही देणंघेणं नाही. त्यामुळं भाजपच्या एका माजी नगरसेवकानं थेट मनपा आयुक्तांच्या अंगणातच बेड टाकण्याचा बेत तयार केला आहे. हे माजी नगरसेवक केवळ एकटे झोपणार नाहीत. तर अकोल्यातील त्रस्त नागरिकांना मनपा आयुक्तांच्या बंगल्यात घेऊन जाणार आहेत. महापालिका प्रशासनावर संतापलेले हे माजी नगरसेवक आहेत गिरीश जोशी.

कुछ करते क्यो नही?

माजी नगरसेवक गिरीश जोशी यांचं घर शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या जवळ आहे. केवळ जोशीच नव्हे तर शहरातील प्रचंड मोठी लोकवस्ती मोर्णा नदीच्या दोन्ही काठावर वसली आहे. सुमारे पाच ते सात किलोमीटर लाबंपर्यंत नदीच्या दुतर्फा शेकडो कुटुंब आणि हजारो नागरिक राहतात. समस्यांच्या वेदना सहन करणाऱ्या या अकोलेकरांना आता अनेक डंख सोसावे लागत आहेत. मोर्णा नदीच्या स्वच्छतेमुळं हे डंख अकोलेकरांची झोपही उडवत आहे व त्यांना जीवघेण्या मलेरिया, डेंग्यूसारखे आजाराचा धोकाही निर्माण करीत आहेत. मोर्णा नदीच्या पात्रात वाढलेल्या जलकुंभीमुळं डासांचा हा उपद्रव आता असह्य झाला आहे.

Devendra Fadnavis : गड मुख्यमंत्र्यांचा पण गल्ली अंधाराची

पूर्वी अकोल्यात दिवसा डास डंख मारायचे. पण आता परिस्थिती अशी आहे की चालता, बोलताही डासांची झुंबड अकोलेकरांना स्वच्छ बसू देईनाशी झाली आहे. अकोल्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक पांडे यांनी मोर्णा नदी स्वच्छतेची मोहिम सुरू केली होती. बघता बघता ही मोहिम लोकचळवळ बनली. पण पांडे गेले अन् श्रमाचे भांडे पुन्हा रिकामे झाले. आता महापालिका मोर्णा नदीतून जलकुंभी काढल्यासारखे दाखवत आहे. पण डासांची संख्या पाहता हे काम किती प्रभावीपणे सुरू आहे याची कल्पना येते. अकोला शहराच्या महापालिकेवर सध्या प्रशासक राज आहे.

डॉ. सुनील लहाने हे अकोला महापालिकेचे आयुक्त आहेत. आयुक्त कोणत्याही विद्याशाखेतील डॉक्टर का असेना त्यांना डासांमुळं होणारा उपद्रव अन् डेंग्यू, मलेरिया धोका नक्कीच ठाऊक आहे. महापालिकेला आजपर्यंत झोकून देत विकास करणारा आयुक्त मिळालाच नाही. हे अकोला महापालिकेचे दुर्दैव आहे. अशात आयुक्तांकडून मोठमोठी कामं व्हावी, अशी अपेक्षाही आता अकोल्यातील जनता करीत नाही. परंतु स्वच्छता आणि मोर्णा नदीची सफाई अशी लहानसहान कामं आयुक्त लहाने यांनी करावी, अशी मागणी आता होत आहे.

माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी अकोलेकरांची हिच व्यथा मांडली आहे. पाच दिवसात नदीतील जलकुंभी स्वच्छ न झाल्यास खाट, गादी, उशी घेऊन जोशी अकोलेकरांसह आयुक्तांच्या बंगल्यात पोहोचतील हे नक्कीच. त्यामुळं महापालिका आयुक्तांनी आपल्या हाताखालील यंत्रणेला विकासाची ‘कछुआ छाप’ अगरबत्ती विझवायला लावावी, अन्यथा आंदोलक त्यांची ‘गुड नाइट’ खराब करतील यात दुमतच नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!