
नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेसवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसवर जोरदार आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेसचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी समाजात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या दंगाग्रस्त दौरा समितीत अकोला दंगलीतील आरोपींचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप करत खोपडे यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

काँग्रेसने हेतुपुरस्सर हिंदू समाजाला लक्ष्य करत त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम केले आहे. नागपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पद्धतशीर कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. दंग्याच्या दिवशी भालदारपुरा आणि हंसापुरी या भागांतील रस्त्यांवर रोज चारशे ते पाचशे वाहने पार्क केली जातात, मात्र त्या दिवशी एकही वाहन नव्हते, यावरून ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते, असे खोपडे यांचे मत आहे.
निष्क्रियतेमुळे समाज असुरक्षित
दंगल सुरू असताना काँग्रेसचा एकही नेता मदतीसाठी पुढे आला नाही. उलट, काँग्रेस भवन बंद ठेवून त्यांनी समाजाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. दंगलखोरांनी हिंदूंच्या घरांवर हल्ले चढवले, दरवाजे तोडले आणि वाहने पेटवून दिली, मात्र काँग्रेसने या घटनांकडे दुर्लक्ष करत आपला हिंदूविरोधी चेहरा उघड केला आहे.
दंगलीदरम्यान पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत, त्यामुळे हिंसाचार अधिकच वाढला. आमदार खोपडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला आहे. संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.
समाज एकत्र येणार
दंगलीत निर्दोष नागरिकांच्या गाड्या पेटवण्यात आल्या, त्यांच्या व्यवसायिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. मात्र, या नागरिकांचे काय? या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा संतप्त सवाल उपस्थित करत खोपडे यांनी सरकारला ठोस कारवाईची मागणी केली आहे. दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात यावा आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खोपडे यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस कितीही राजकीय खेळी खेळू पाहत असली तरी हिंदू समाज एकत्र येईल आणि त्यांच्या विरोधात उभा राहील. नागपूरच्या दंगलीने काँग्रेसचा खरा चेहरा उघड केला आहे. त्यांची हिंदूविरोधी मानसिकता संपूर्ण राज्याने पाहिली आहे. सरकारने आता लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.