महाराष्ट्र

Chandrapur : सत्तेच्या सावलीतच खनिजीतून सोनं लुटलं जातंय

Sand Smuggling : भाजप नेत्यांचा सहभाग उघड, महसूल यंत्रणेकडून हलगर्जीपणा

Author

सत्तेच्या छत्रछायेत चंद्रपूर जिल्ह्यात खनिजांची खुलेआम लूट सुरू असून प्रशासन केवळ पाहुण्याची भूमिका बजावत आहे. भाजप नेत्यांच्या सहभागामुळे खनिज चोरीचा हा काळोखा जाळाच आता उघडकीस येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात खनिज चोरीचा भस्मासूर वेगाने वाढत आहे. यात सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने होणाऱ्या गैरव्यवहारांचा आता फास उलगडू लागला आहे. ज्यांच्या तोंडी विकासाचे गोडवे, त्यांनीच विकासकामांना लागणाऱ्या खनिजांवर डल्ला मारल्याचे उघड होत आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रशासनाला खडसावत वाळू मिळवून देण्याची घोषणा केली. असे असले तरी भाजपमधीलच नेते आणि त्यांचे नातेवाईक खनिज चोरीत आघाडीवर असल्याचे वास्तव समोर आले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा गावाचे सरपंच आणि भाजपचे तालुका महामंत्री निलेश गिरमा पुलगमकार यांच्या नावाने नोंद असलेल्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करत मुरूम भरलेला ट्रॅक्टर जप्त केला आहे. रविवारी वेडगाव येथे तलाठी विकास चोपडे यांनी थेट घटनास्थळी धाव घेत ही कारवाई केली. पुलगमकार हे स्वतःच्या ट्रॅक्टरद्वारे मुरूम चोरी करत असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून महसूल विभागाला मिळाली होती. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली सुरू असलेल्या खनिज तस्करीचा भांडाफोड झाला आहे.

खुलेआम चोरी

गोंडपिपरीतील लिखितवाडा वाळू घाटातून दिवसाढवळ्या वाळूचा अवैध उपसा सुरू असूनही महसूल विभाग कारवाईस टाळाटाळ करत आहे. या तस्करीत राजुरा येथील भाजप नेत्याच्या नातेवाईकाचा सहभाग असल्याच्या चर्चा सध्या जोरात आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हद्दीत हे सर्व प्रकार घडत आहेत. त्यांच्या क्षेत्रातच वाळू आणि मुरूम चोरीचे खुले केंद्र तयार झाले आहे.

Yashomati Thakur : सुजलाम महाराष्ट्राला भाजपच्या दारिद्र्याची लागण

या प्रकरणात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे शासकीय खनिकर्म विभागाच्या ट्रकमधून वाळूची अवैध वाहतूक केल्याची माहिती काही जागरूक नागरिकांनी नायब तहसीलदारांना दिली. महसूल विभागाचे गस्त पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला, मात्र ट्रकमधून वाळू न सापडल्याचे कारण देत ट्रक जप्त केला नाही. थोड्याच वेळात ट्रक चालकाने गाडी घेऊन पळ काढल्याने संशय बळावला. नायब तहसीलदार मनोज आकनुवार यांनी प्रतिक्रिया देताना पुढील कारवाई जिल्हा खणीकर्म अधिकारी करतील, असे सांगून जबाबदारी टाळली.

वाळू तस्करीची नंदनवनं

भद्रावती तालुक्यातील कचराळा, जेना, चंदनखेडा, पाटाळा, पारोधी, पिपरी, कोंढा, चारगाव, मुधोली, कोकेवाडा या घाटांवरून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सुरू आहे. अनेक घाटांचे लिलावही न झाल्याने ही तस्करी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. वर्धा नदीवरील राळेगाव वगळता अन्य घाटांवरून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. महसूल व खणीकर्म विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या गैरव्यवहारातून आर्थिक संपत्ती गोळा केली आहे. त्यांच्याविरोधात जनतेत तीव्र रोष निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात विकासकामांसाठी लागणाऱ्या खनिजांची टंचाई भासत असताना, तीच खनिजं काही राजकीय नेते आणि अधिकारी चोरी करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. आता या प्रकरणी निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने न पाहिल्यास हा खनिज भ्रष्टाचार आणखी गहिरा होईल, आणि विकासाच्या नावाखाली सुरू असलेली लूट जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!