
भाजप नेते दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक रघुनाथ मालीकर यांनी आपल्या पत्नीसमवेत नागपूरमध्ये मंत्री आशीष जयस्वाल यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.
नागपूरच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. भाजप नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक असलेले रघुनाथ मालीकर यांनी आपली पत्नी व माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांच्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. नागपूरच्या रविभवन येथे 5 मे रोजी पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात विविध पक्षांतील अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्ते एकत्र येत शिंदे गटात सामील झाले. या प्रसंगी राज्याचे राज्यमंत्री आणि शिवसेना नेते आशीष जयस्वाल यांच्या उपस्थितीत सर्वांचा औपचारिक पक्षप्रवेश झाला. या घडामोडीने नागपूरच्या स्थानिक राजकारणात नवा रंग भरला आहे.
रघुनाथ मालीकर हे अनेक वर्षांपासून दत्ता मेघे यांचे निकटवर्ती मानले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच त्यांनी मेघेंची साथ धरली होती. एकेकाळी नागपूर महापालिकेत उपमहापौरपद भूषवलेल्या मालीकर यांची राजकीय कारकीर्द नेहमीच मेघेंच्या छत्रछायेखाली राहिली. त्यांच्या पत्नी पुष्पा मालीकरही राष्ट्रवादीतून नगरसेविका राहिल्या. दत्ता मेघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु मालीकर यांनी भाजपमध्ये जाणे टाळले. मात्र, त्यांनी मेघेंच्या निष्ठेचा वारसा कायम ठेवला.

Akola : दलित वस्ती निधीवर शिंदे गटाला भाजपने दिली सापत्न वागणूक
बदलता राजकीय मार्ग
त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी थेट शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे. हे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या कार्यक्रमात मालीकर दाम्पत्यासोबत अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवक दिलीप मडावी, विठ्ठल हेडाऊ, विकास नागभिडे, मनसेचे मोरेश्वर धोटे, योगेश गोंडाणे, परसराम बोकडे, ठाकरे गटाचे रामदास गुडधे आणि भीमराव मंदनवार यांचा समावेश होता. तसेच माजी नगरसेविका दुर्गा रेहवाडे, काँग्रेसच्या लक्ष्मी बैलतवार, आदिम समाजाचे प्रतिनिधी विमल पौणीकर यांनीही शिंदे गटात उडी घेतली.
सर्व नेत्यांचा एकत्रित पक्षप्रवेश ही शिवसेना शिंदे गटासाठी मोठी राजकीय ऊर्जा मानली जात आहे. कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेचा विस्तार आता नागपूर शहरातही वेग घेताना दिसतोय. या कार्यक्रमात बोलताना आशीष जयस्वाल यांनी सांगितले की, शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, सामान्य माणसालाही आता शिवसेना आपली वाटू लागली आहे. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. पक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेना नागपूर शहर जिल्हाप्रमुख बंडू तळवेकर, जिल्हाप्रमुख राजू हरणे, उपजिल्हाप्रमुख अशोक झिंगरे, युवासेना जिल्हाप्रमुख राजेश गोमकाडे, उपजिल्हाप्रमुख कमलेश शरणांगत आणि वैद्यकीय सहायता कक्षाचे जिल्हाप्रमुख गौरव पनवेलकर यांचीही उपस्थिती होती.