महाराष्ट्र

Parinay Fuke : जोपर्यंत निलंबन नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही

Maharashtra Legislative Council : परब यांच्या विधानावर फुके आक्रमक, महाविकास आघाडीवरही टीका

Post View : 22

Author

अनिल परब यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप नेते परिणय फुके आक्रमक झाले आहेत. या प्रकरणावर जोरदार राजकीय गदारोळ निर्माण झाला असून, परब यांच्या निलंबनाची मागणी होत आहे.

महाराष्ट्राच्या राजधानीत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय नेत्यांचे घमासान सुरू आहे. विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काही वक्तव्यांमुळे प्रचंड वाद निर्माण झाले आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांना अधिवेशन कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. मात्र, हा वाद संपतो न संपतो तोच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे विधान परिषद सदस्य अनिल परब यांच्या दोन वक्तव्यांमुळे नवीन वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना अनिल परब यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटले, राज्यपालांचं अभिभाषण हे महाराष्ट्र सरकारसाठी रोडमॅप असतं, पण तुम्ही राज्यपालांना चुकीच्या आणि खोट्या रस्त्यावर नेत आहात. राज्यपालांसमोर चुकीचा आरसा धरला जात आहे, चुकीचे मार्गदर्शन दिले जात आहे, आणि म्हणूनच मी राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करतो. परब यांच्या या विधानानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

Devendra Fadnavis : स्थगिती देत सुटायला मी उद्धव ठाकरे नाही

सदस्यत्व रद्द   

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके देखील परब यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्रमक झाले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. त्यांनी राज्यपालांबद्दल केलेली टीका म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे. परिणय फुके यांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला असून, जोपर्यंत परब यांचं विधान परिषद सदस्यत्व रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असे ठणकावून सांगितले.

कामकाजाच्या पाचव्या दिवशीही या मुद्यावरून परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. फुके यांनी सभापती आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यपालांचा अपमान करण्याच्या हेतूने परब यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितलं की राज्यपालांचं अभिभाषण एकदम खालच्या दर्जाचं होतं. हे पूर्णपणे असत्य आहे. राज्यपालांविषयी अशा शब्दांत बोलणं हा अपमान आहे आणि आम्ही त्याला कदापिही माफ करू शकत नाही.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर 

परिणय फुके यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावरही जोरदार टीका केली. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या होत्या. त्या काळातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल उत्तर द्यायचं असेल, तर त्यांनी आधी स्वतःकडे पाहावं, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कायदा आणि सुव्यवस्था योग्यरीत्या राखली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. काही घटना निश्चितच घडल्या असतील, आणि त्या निषेधार्ह आहेत, पण आजच्या सरकारने राज्यात चांगलं प्रशासन दिलं आहे, असे ते म्हणाले.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!