भाजपच्या ‘हिंदू खतरे में’ या घोषणेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी थेट व्होट-जिहाद ठरवत सडेतोड हल्ला चढवला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हिंदुत्ववादी सरकार असूनही भीतीचं राजकारण करणं म्हणजे फक्त सत्तेसाठीचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजकारणाच्या रणांगणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी असा प्रहार केला की, भाजपच्या हिंदुत्वाच्या गढीत खळबळ उडाली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपच्या ‘हिंदू खतरे में है’ या घोषणेवर हल्ला चढविला. यास त्यांनी जुनाट पण राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरलेल्या घोषणेला थेट ‘व्होट-जिहाद’ असं संबोधलं. भाजपला हिंदुत्वाशी काही घेणंदेणं नाही, त्यांना फक्त सत्ता हवी. आमच्या सत्ताकाळात हिंदू सुरक्षित होता. आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत हिंदुत्ववादी सरकार असूनही ‘हिंदू खतरे में है’ हा टाहो फोडणं म्हणजे फक्त लोकांना घाबरवून मतं मागणं. हे सरळसरळ व्होट-जिहाद आहे, असा तीव्र हल्ला त्यांनी केला.
वडेट्टीवारांनी भाजपच्या हिंदुत्वप्रेमावर टोलाही लगावला. तुम्ही हिंदुत्वाचे ठेकेदार असल्यासारखे अभिनय करता, पण प्रत्यक्षात फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजता. हिंदूंच्या नावावर भीतीचं वातावरण निर्माण करून मतं मागणं हा निव्वळ राजकीय व्यापार आहे. जनतेला तुम्ही फसवू शकता, पण कायमचा नाही, असा टोला त्यांनी लगावला.
Harshwardhan Sapkal : लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून टाका
राजकीय खळबळ
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, राज ठाकरे काय भूमिका घेतात हे ते ठरवतील. दोन भावांमध्ये युती झाली तर आम्हाला आनंदच आहे. पण दोन बंधू एकत्र आलेत, हे ऐकूनच अनेकांच्या पोटात गोळा येतोय, झोप उडतेय. मात्र हा निर्णय राष्ट्रीय पातळीवरचा नसून स्थानिक पातळीवरचाच आहे. ठाकरे बंधूंना आधी एकत्र यायला द्या, त्यानंतर काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, आम्ही विरोधक आहोत, आमचं आम्ही पाहू. सत्ताधारी कुठे-कुठे हात मिळवतायत ते पाहणं महत्त्वाचं. काही ठिकाणी आघाडी होईल, काही ठिकाणी नाही. त्यात फारसा गाजावाजा करण्यासारखं काही नाही. इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी होती, तर मविआ विधानसभा निवडणुकीसाठी. स्थानिक आघाडीचा निर्णय स्थानिक नेते घेतात, राष्ट्रीय नेते नाही.
बोगस मतदान
बोगस मतदानाच्या वादावर वडेट्टीवारांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. राहुल गांधींनी जेव्हा बोगस मतदानाचा मुद्दा मांडला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे मागितले. राहुलजींनी दिल्लीमध्ये पुरावे सादर केल्यावर ही लोकं सलीम-जावेदचं नाव घेऊ लागली. उद्या दाऊदचं नाव घेतील. लोकांची नावं घेऊन तुम्ही तुमची चोरी लपवू शकत नाही. हे फक्त लक्ष विचलित करण्याचं साधन आहे, असा वादग्रस्त आरोप त्यांनी केला.
मतदार याद्यांमधील गोंधळावरून वडेट्टीवार म्हणाले, राहुल गांधींनी भाजपवर नाही, तर निवडणूक आयोगावर आरोप केला होता. मग तुम्ही त्याचे वकील का बनताय? मतदार यादीतील गोंधळाचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. आमचा प्रश्न आयोगाला आहे, तुम्हाला नाही. तुमच्याकडे उत्तर मागितलेलंच नाही, मग मध्ये पडून तुम्ही काय सिद्ध करणार?
अंतिम प्रहार
विजय वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचाराला लक्ष्य करत स्फोटक विधान केलं. आमच्या काळात हिंदू सुरक्षित होता. आता पूर्ण देशात तुमचं सरकार असूनही तुम्ही हिंदूंना घाबरवताय? मग खरा धोका कुठे आहे, हिंदूंना की तुमच्या खुर्चीला? लोकांना घाबरवून मतं मिळवणं हे राजकारणाचं सर्वात घाणेरडं रूप आहे. भाजप आज हेच करत आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.