
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीने आणि कंबर कसून तयारी करत आहे. मात्र, भाजपमध्ये उमेदवारीच्या प्रक्रियेत आता नवे नियम लागू करण्यात आले आहेत. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता फक्त तिकिट मिळवण्याच्या ध्यासात नाही तर खऱ्या मेहनतीने आणि कामगिरीने पक्षाचा गौरव वाढवेल, त्यालाच संधी मिळणार आहे, असे पालकमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत दिलेल्या रोखठोक वक्तव्यांमधून स्पष्ट केले आहे.
बावनकुळे म्हणाले की, शिफारशींवर उमेदवारी मिळत नाही. ज्याने पक्षासाठी उत्कृष्ट कामगिरी केली, ज्याला 51 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवण्याची क्षमता आहे, त्यालाच तिकीट मिळणार आहे. जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्षांच्या मागे फिरणाऱ्यांना पक्षाकडून तिकीट कापले जाईल. या धक्कादायक घोषणेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश आणि स्पर्धा निर्माण झाली आहे.अमरावती येथील परिणय बंध सभागृहात आयोजित भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बावनकुळे यांनी पक्षाची आगामी निवडणुकीतील धोरणे स्पष्ट केली. या वेळी माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, केवळराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, माजी आमदार प्रवीण पोटे आदी उपस्थित होते.

प्रामाणिक कार्यकर्त्यांची निवड
अमरावती जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता येथे दोन जिल्हाध्यक्ष आणि एका शहराध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कुणाच्या दबावाने नाही, तर पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान देऊन करण्यात आली आहे, अशी स्पष्टीकरणे बावनकुळे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत माघार घेणाऱ्या आणि पक्षाच्या आदेशांचे पालन करणाऱ्यांना हे सन्मान मिळाले आहे. प्रभुदास भिलावेकर, रविराज देशमुख यांसारख्या नेत्यांनी माघार घेतल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले गेले आहे.
शिक्षक मतदारसंघातून डॉ. नितीन धांडे यांनीही प्रतिकूल परिस्थितीत लढत पक्षासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आणि त्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या अध्यक्षांना लीडर नसून कार्यकर्ते म्हणून वागण्याचा सल्ला दिला. पक्षाने एकूण 11 कार्यक्रम दिले आहेत. त्यांना यशस्वी करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी माजी आमदार प्रवीण पोटे यांना शहराध्यक्षपदाची दुसऱ्यांदा संधी नाकारली गेल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होते.
Harshwardhan Sapkal : टेंडरच्या बोगद्यात लाचखोरीचा प्रकाशझोत
बावनकुळे यांनी त्यांना कार्यमग्न होण्याचा सल्ला दिला आणि उदाहरणार्थ नवनीत राणाला घेतले, ज्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जाऊनही पक्षासाठी सतत काम केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्व नेत्यांनी एकत्र येऊन व्यूहनीती आखावी आणि पक्षाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे देखील बावनकुळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले.