महाराष्ट्र

Akola : आमदार, खासदार सगळे चालते म्हणाला अन् कानाखाली आवाज आला

Railway Program : अकोला रेल्वे स्थळावरील कार्यक्रमातील प्रकार

Share:

Author

अकोला रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या कार्यक्रमादरम्यान सायकल स्टॅन्ड चालकाने उद्धट वागणूक दिल्याने वातावरण चिघळले. भाजप कार्यकर्त्यांच्या व आमदाराच्या विनंतीनंतरही अडवणूक थांबवण्यास नकार दिला. अखेर सायकल स्टॅन्ड चालकाला त्याचाच उद्धटपणा भोवला. 

अकोला रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेकडून आयोजित करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना गाड्या पार्किंग करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक सायकल स्टॅन्ड चालकाकडे मदतीची विनंती करण्यात आली, मात्र त्याने अत्यंत उद्धटपणे वागणूक दिली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ टाळण्यासाठी काही भाजप कार्यकर्त्यांनी सायकल स्टॅन्ड चालकाकडे गाड्या पार्क करण्याची विनंती केली. मात्र, संबंधित चालकाने या विनंतीवर रागाने प्रतिक्रिया देत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे भाजपचे एक आमदार आले. आमदारांनी स्वतः पुढाकार घेत सायकल स्टॅन्ड चालकाची समजूत काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांनी सौम्य शब्दांत सांगितले की, कार्यक्रमामुळे गर्दी झाली आहे, लोक थोडा वेळ थांबतील आणि कार्यक्रम संपताच निघून जातील. त्यामुळे लोकांना पार्किंग करू द्या.

Nagpur : बनावट कागदपत्र, अनुभवही खोटा, मुख्याध्यापकाने मात्र खऱ्या घेतल्या नोटा 

संतप्त कार्यकर्ते

आमदारांच्या नम्र विनंतीनंतरही सायकल स्टॅन्ड चालकाने उद्धटपणा कायम ठेवत ‘अपने को आमदार हो या खासदार कोई भी चलता’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. या उद्धटपणामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. अखेर संतप्त कार्यकर्त्यांपैकी एकाने त्याला जोरदार कानशिलात लगावली. या प्रकारानंतर सायकल स्टॅन्ड चालकाचा अहंकार दुखावला गेला आणि तो थेट रामदास पेठ पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांकडे धाव घेत तक्रार घेऊन गेला. मात्र, हे पोलीस कर्मचारी देखील कार्यक्रमासाठी रेल्वे स्थानकावर बंदोबस्तासाठी आलेले होते. त्यांनी सायकल स्टॅन्ड चालकालाच झापत विचारले, इतके लोक आणि आमदार तुम्हाला विनंती करत आहेत, तरीही तुम्ही वाद घालताय?

पोलिसांचा आणि कार्यकर्त्यांचा रोष पाहून अखेर सायकल स्टॅन्ड चालकाने आपली चूक मान्य करत भाजप कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची माफी मागितली. त्यामुळे अखेर या वादावर पडदा पडला. या घटनेतून एक स्पष्ट संदेश समाजात गेला आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची अडवणूक करणाऱ्या, विनंती न ऐकणाऱ्या व्यक्तींचा उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही. भाजप आमदारांनी संयम राखत शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, तर कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत समाजहिताची भूमिका घेतली. हे प्रकरण काही एकटं वा अपवादात्मक नाही. अकोल्यातील रेल्वे स्थानकावरील हा सायकल स्टॅन्ड चालक पूर्वीही अनेक वेळा नागरिकांची अडवणूक करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, यावेळी त्याचा उद्धटपणा त्यालाच भोवला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!