
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा साथ न देणाऱ्या अनेकांना यंदा महानगरपालिका निवडणुकीमध्ये घरी बसावं लागणार आहे. या संदर्भात एक लिस्ट तयार झाली आहे. स्थानिक पातळीवरून ही नावे वरती कळविण्यात येणार आहे.
अकोला भारतीय जनता पार्टीतून विधानसभा निवडणुकीत पक्षाचं काम न करणाऱ्या लोकांना बंडखोर ठरविण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत गृहयुद्ध बघायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं काम न करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांची नाव यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या यादीमध्ये दिसणार नाही. त्यामध्ये दोन माजी महिला महापौरांचा देखील समावेश आहे.

भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पातळीवर अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची हे जरी ठरलेलं असलं, तरी कोणाची उमेदवारी कापायची यासाठी कात्रीला चांगलीच धार लावली गेली आहे. ज्या उमेदवारांची नाव यादीतून कापायची आहे, ती नावं केवळ ‘द लोकहित लाइव्ह’च्या हाती लागली आहेत.
काम न करणाऱ्या उमेदवारांना यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये घरी बसविण्यात येणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर अकोल्याच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचा लागणार आहे. अश्विनी हातवळणे यांचे पती प्रतुल हातवळणे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे काम केले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी अश्विनी यांना यंदाची महापालिका निवडणूकची उमेदवारी नाकारण्यात येणार आहे. अश्विनी हातवळणे आणि प्रतुल हातवळणे हे नितीन गडकरींचे समर्थक असल्याचे सांगितले जाते. पूर्ती समूहामध्ये देखील प्रतुल हातवळणे कार्यरत होते. परंतु हातवळणे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तरी का, हे स्पष्ट आहे.
Akola Shiv Sena : निवडणुकीच्या रणभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण सज्ज
ताईंचा पत्ताही कापणार
दुसऱ्या माजी महिला महापौर आहेत सुमन गावंडे. सुमन गावंडे या अकोल्याच्या पहिल्या महिला महापौर होत्या. अकोलामध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्या महापौर होण्याच्या बहुमान सुमन गावंडे यांना मिळाला होता. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचे नाव देखील कापले जाणार आहेत.
सुमन गावंडे यांचे पती हे पोलीस विभागामध्ये कार्यरत होते. किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणामध्ये त्यांच्या परिवाराचे नाव आल्यामुळे सुमन गावंडे यांना यंदाच्या महापालिका निवडणुकीपासून दूर ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे यामागील खरं कारण नाही. भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते तथा माजी नगरसेवक गणेश ढगे यांचे चिरंजीव सतीश ढगे यांचे नाव देखील उमेदवारांच्या यादीतून कापण्यात येणार आहे. यासाठी भाजपच्या नेत्यांनी कात्रीला धार लावली आहे. अजय शर्मा आणि विजय इंगळे यांना देखील उमेदवारी नाकारली जाणार आहे.
बाळ टाले, जानवी डोंगरे, सारीका जयस्वाल आणि राजेंद्र गिरी यांचे नाव देखील महापालिका निवडणुकीच्या उमेदवार यादीत येणार नाही, यासाठी योग्य ती नाकाबंदी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे. आशिष पवित्रकार यांचे नाव देखील उमेदवार यादीतून काढण्यात येणार आहे. या सर्वांच्या नावांसह भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा आणि श्रीराम नवमी उत्सव समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची नावे देखील यंदा भाजपच्या उमेदवार यादीत दिसणार नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपकडून नगरसेवक पदासाठी नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार? याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
लालाजींच्या समर्थकांना शिक्षा
दिवंगत भाजप आमदार गोवर्धन शर्मा, माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कोणत्याही समर्थकाला यंदाच्या कोणत्याही महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळणार नाही. त्याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे लालाजी यांच्या सर्व समर्थकांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोणतीही अपेक्षा ठेवू नये, असे चित्र आहे. यासाठीची पूर्ण तयारी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे.
यंदाच्या अकोला महानगरपालिका निवडणूकमध्ये भारतीय जनता पार्टी मध्येच चांगले युद्ध बघायला मिळणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या खास मर्जीत असलेल्यांपैकी एक गिरीश गोखले यांचे नाव देखील उमेदवारी यादीत येऊ नये, यासाठी प्रचंड ‘फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. अशीच फिल्डिंग मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या उमेदवारीबाबतही लावण्यात आली होती.
आमदार हरीश पिंपळे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा उमेदवारी मिळू नये, यासाठी चौफेर व्यूहरचना करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आमदार पिंपळे यांची ढाल बनले. त्यामुळे हरीश पिंपळे यांचे नाव अगदी अखेरच्या क्षणी जाहीर करण्यात आले. नाव जाहीर झाल्यानंतर आमदार हरीश पिंपळे हे भावनिक झाले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या अश्रूंना वाटही मोकळी करून दिली होती. खरं तर आमदार हरीश पिंपळे यांनी भाजप आणि मतदारसंघात प्रचंड काम केले आहे. कार्यकर्त्यांना जपणारा आमदार म्हणून ते ओळखले जातात.
छोट्यात छोट्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असला तरी आमदार पिंपळे यांच्या व्हॉट्स ॲपवर त्याचे स्टेटस असते. अशा नेत्याचे तिकीट कापण्याचा प्रयत्न होणे, हा भाजपसाठी अशुभ संकेत आहे. असाच प्रकार आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या बाबतीतही झाला होता. त्यामुळे सध्या अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी केवळ काही नेत्यांपुरती उरली आहे. उर्वरित सर्व नेते आणि पदाधिकारी एकीकडे झाले आहेत.
याच गटबाजीची पुनरावृत्ती महानगरपालिका निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. या सर्व संभाव्य बंडखोरांशी दोन हात करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी चालवली आहे.
काँग्रेसचे बळ वाढले
अकोल्यामध्ये भाजपचा गढ असलेला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ पक्षाच्या हातून निसटला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये का नुकसान झाले आणि कुणामुळे नुकसान झाले, हे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीला चांगलेच ठाऊक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या संदर्भामध्ये भाजपला अवगत केले होते. परंतु केवळ काही लोकांना डोक्यावर घेऊन नाचण्याची सवय प्रदेश कार्यकारणीतील काही नेत्यांना असल्यामुळे अकोल्यामध्ये भाजपचा एक एक करीत बुरुज कोसळणे सुरू झाले आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी काही हेकेखोर नेत्यांना लगाम लावून ‘डॅमेज कंट्रोल’ न केल्यास यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अकोल्याच्या मोर्णा नदीमध्ये विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया आता पक्षातील नेते आणि पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
अकोला जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे बळ वाढत आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांचा विजय झाल्यानंतर, यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढेल, असे सांगितले जात आहे. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जवळीक पाहता अकोल्यामध्ये देखील शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांना सपोर्ट देऊन निवडणूक लढतील यात काही दुमतच नाही.
या एकूण परिस्थितीमध्ये जातीय आधारावर ज्या मुस्लिम उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता, ते सर्व मुस्लिम नेते आणि मतदार यंदा तितक्याच ताकदीने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहणार आहेत. त्यांची तशी बोलणीही सुरू आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल तसे हे चित्र स्पष्ट दिसत जाईल.
स्वबळाची तयारी
अकोल्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले आहे. महानगरपालिकेमध्ये कोणताही कंत्राट आम्हाला दिल्या जात नाही. कोणताही विकास निधी आम्हाला दिला जात नाही, अशी तक्रार यापूर्वीच शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अलीकडेच यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या तक्रारीची दखल घेत अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्याशी फोनवर चर्चाही केली. या चर्चेमध्ये शिवसेना नेत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. या नाराजीच्या वातावरणातच शिवसेना एकनाथ शिंदे गट आता स्वबळावर अकोल्यामध्ये निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.
गेल्या दोन बैठकीमध्ये शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी अकोल्यात महायुती करू नका, असा आग्रह एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला आहे. अकोल्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली नाही, तर भाजपला अधिक नुकसान सहन करावं लागू शकते असं दिसत आहे.
भाजपकडून यंदा महापौर पदाचा चेहरा कोण असणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. मात्र स्थानिक काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी महापौर कोण असेल, हे ठरवून टाकले आहे. त्या नेत्याच्या नावाने अकोल्यामध्ये व्यापक प्रमाणावर प्रचार केला जात आहे. त्यामुळेच हाच नेता महापौर पदाचा उमेदवार असेल, तर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मतदान करू नका, अशी मानसिकता आता तयार होत आहे.
भकास शहर
अकोला शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. स्वच्छता नियमितपणे केली जात नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कोणतेही कारण नसताना अनेक तासापर्यंत अकोल्यात वीजपुरवठा खंडित असतो. अकोल्यामध्ये नितीन गडकरी यांनी उपकार करीत बांधून दिलेला भूमिगत रस्ता पाण्याखाली बुडाला. गडकरींनी बांधलेला उड्डाणपूल अवघ्या काही दिवसामध्ये दुरुस्त करावा लागला. डाबकी रोडच्या रेल्वे क्रॉसिंगवर बांधलेला उड्डाणपूल देखील काही दिवस बंद होता. याच भागातील रस्ता खणून ठेवला आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. किल्ला चौक ते पोळा चौकपर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट आहे.
विकास म्हणून अकोल्यात काहीच नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये टिपू सुलतानच्या नामाकरणाचा मुद्दा प्रचंड गाजला. आता महापौर पद मिळवून टिपू सुलतान यांचे नाव हटवून दाखविले, अशी कामगिरी करण्याची इच्छा भाजपला आहे. मात्र भारतीय जनता पार्टीमध्येच सध्या प्रचंड अंतर्गत कलह आणि गटबाजी सुरू आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला कितपत यश मिळतं हे आता येणारी वेळे सांगू शकेल.