महाराष्ट्र

Buldhana : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिंदेंनी’ आणला भूकंप

Vijayraj Shinde : बुलढाण्याच्या राजकारणात स्वबळाचा स्फोट

Author

बुलढाण्यात भाजपने स्वबळाचा नारा देत आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामाची दिशा स्पष्ट केली आहे. जिल्हाध्यक्षांच्या घोषणेनंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणे नव्यानं हालण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुलढाण्याच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा भाजपच्या ‘स्वबळ’ बाणानं महायुतीच्या एकतेला सरळ छेद दिला आहे. सत्तेच्या ‘सह्याद्री’वर तीन तट बांधलेले असले तरी जिल्ह्याच्या गाभ्यात आता भाजप स्वतंत्रपणे खेळण्याच्या तयारीत आहे. हा फटका थेट महायुतीच्या एकात्मतेवर बसणार असून, भाजपच्या या घोषणेनं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हांची छाया उमटवली आहे. यामुळे बुलढाणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी 13 जुलै रविवारी घोषित केलं की, बुलढाणा महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावरच लढवणार आहोत. हा निर्णय म्हणजे केवळ स्थानिक नाही, तर राज्याच्या राजकारणातही लाट निर्माण करणारा आहे. कारण भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांचा महायुतीतला युतीधोरण अजूनही अनिश्चिततेच्या चक्रव्यूहात अडकलेला असतानाच भाजपने बुलढाण्यात ‘स्वबळ’ ही रणनिती जाहीर करून एक वेगळीच दिशा घेतली आहे.

भाजपचं वर्चस्व

बुलढाणा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि तो पुन्हा झळकविण्याची वेळ आली आहे, असं म्हणत विजयराज शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आणि आकांक्षा स्पष्टपणे मांडल्या. नगराध्यक्ष असोत, की नगरसेवक, या शहरात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. बुलढाणा शहरात 10 ते 15 नगरसेवक फक्त भाजपचेच राहिले आहेत. त्यामुळे बुलढाणा महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी आणि हे वैभव पुन्हा प्रस्थापित करणं हाच आमचा उद्देश आहे, असं शिंदे ठामपणे म्हणाले.

विजयराज शिंदे यांचं विधान फक्त निवडणूक लढविण्यापुरतं सीमित नाही, तर ही एक राजकीय संदेशवहनाची मोठी चिठ्ठी आहे. जिथं कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि स्थानिक प्रभावाच्या जोरावर भाजप पुन्हा आपला झेंडा फडकवू इच्छित आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवतील, त्या ठिकाणी आम्ही युतीकडं न पाहता स्वतंत्रपणे उतरणार. या साऱ्या घडामोडींमधून आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, भाजप स्थानिक पातळीवर आपली ताकद आणि आत्मनिर्भरता सिद्ध करत आहे. परंतु त्याचवेळी, महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या स्थानिक नेत्यांची भूमिकाही यानंतर अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

उत्सुकता शिगेला

‘स्वबळ’ या शब्दाच्या घोषणेनं महायुतीच्या ‘मौन करार’चं कवच भेदलं आहे. त्यामुळेच आता राज्याच्या सत्तास्थानापासून जिल्ह्याच्या नगरपरिषदांपर्यंत युतीधोरणात काय खदखदते आणि कोण कुठं वळणार, याची उत्सुकता वाढली आहे. आता बुलढाण्यात भाजपच्या आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्याने शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील काय हालचाली असतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!