
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संताप उसळला आहे. या घटनेवर भाजप युवती आघाडीच्या डिम्पी बजाज यांनी ठाम प्रतिक्रिया दिली आहे.
काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालेल्या या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर भाजप युवती आघाडीच्या धडाडीच्या पदाधिकारी डिम्पी बजाज यांनी आक्रमक भूमिका घेत, पाकिस्तानविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिक्षण आणि समाजसेवेत सक्रीय असलेल्या डिम्पी बजाज यांनी आपल्या व्यक्तिगत अनुभवाच्या आधारे भावनिक आणि राष्ट्रवादी भूमिका मांडली आहे.

डिम्पी बजाज यांचे कुटुंब नुकतेच काश्मीरच्या पहलगाम येथून परतले आहे. त्या ठिकाणी घडलेल्या घटनेने त्या अत्यंत व्यथित झाल्या आहेत. त्या म्हणतात, हा एका व्यक्तीचा मृत्यू नव्हे, तर आपल्या स्वातंत्र्यावर, अस्तित्वावर झालेला हल्ला आहे. आम्ही आपले प्राण देणार नाही, तर लढू. गौरव आहे आम्हाला हिंदू असण्याचा. हिंदू तन, हिंदू मन, हिंदू जीवन रग रग माझा परिचय आहे. त्यांच्या या ज्वलंत वक्तव्यामुळे राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या जनतेच्या मनात देशभक्तीची नवी ज्वाला पेटली आहे.
हिंदुत्वाची गर्जना
घडलेल्या घटनेमध्ये द रेजिस्टेंस टेररिस्ट ऑर्गनायझेशनने हिंदू असल्याच्या कारणावरून 28 लोकांचा बळी घेतला. या घटनांनी देशात तणाव निर्माण केला आहे. अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. डिम्पी बजाज यांनी यावर भाष्य करताना स्पष्टपणे सांगितले की, ते जेवढी ताकद लावतील आम्हाला तोडण्यासाठी, आम्ही तेवढ्याच ताकदीने त्यांच्यावर वार करू. या वक्तव्याने त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती यांचा अटळ संगम दाखवला आहे. डिम्पी यांच्या या उद्गारांनी युवकांमध्ये आत्मविश्वासाची लहर निर्माण केली आहे. त्यांचा निर्धार कृतीसाठीची तयारी दर्शवतो. त्या प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या मनात जागा घेणाऱ्या या भ्याड हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सज्ज आहेत.
घडलेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने देखील तात्काळ पावले उचलत पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट सुरक्षा समितीने घेतलेल्या आपत्कालीन निर्णयानुसार, पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या कृषी आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर मोठा परिणाम होणार आहे. तसेच त्यांच्या अर्थव्यवस्थेवरही घाला बसेल. भारत सरकारचा हा निर्णय जागतिक स्तरावरही लक्षवेधी ठरणार आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाला आपले नैसर्गिक स्रोत देण्याची गरज नाही, हे भारताने स्पष्ट केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका अधिक ठाम आणि निर्णायक होईल.
युवती आघाडीचे नेतृत्व
डिम्पी बजाज यांचे विधान प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणातील भावना आहे. त्या आपल्या शब्दांद्वारे लाखो युवकांना जागवतात, प्रेरित करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर भाजप युवती आघाडी नवचैतन्याने भारलेली आहे. राष्ट्रहितासाठी प्रखर भूमिका घेणाऱ्या अशा महिला नेतृत्वाची गरज आजच्या भारताला अधिक आहे. या घटनांमुळे देशात निर्माण झालेला संताप, केंद्र सरकारची ठोस पावले आणि डिम्पी बजाजसारख्या नेतृत्वाची राष्ट्रनिष्ठ भूमिका, हे सर्व एकत्र येऊन भारताला अधिक सक्षम, जागरूक आणि सजग बनवत आहे. पाकिस्तानसारख्या देशाला आता भारताच्या धैर्याचा, धगधगत्या राष्ट्राभिमानाचा खरा अर्थ समजेल.