महाराष्ट्र

Vidarbha : बनावट दारूचा अंधारमय प्रवास बीडहून चंद्रपूरपर्यंत 

Fake Liquor : राजकीय सावलीत नशेचा काळाबाजार 

Post View : 21

Author

विदर्भात बनावट दारूचा विळखा अधिकच घट्ट होत असून, बीडहून सुरू झालेला विषाचा प्रवास आता चंद्रपूर व गडचिरोलीपर्यंत पोहोचला आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड अलीपूरचा प्रशांत चंदनखेडे असून, तो सध्या फरार आहे.

विदर्भात पुन्हा एकदा बनावट दारू प्रकरणाने खळबळ उडवली आहे. चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारूची तस्करी होत असल्याचे गंभीर वास्तव उघडकीस आले आहे. या सगळ्या रॅकेटचा मास्टरमाईंड म्हणून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अलीपूर गावचा प्रशांत तानबाजी चंदनखेडे याचे नाव पुढे आले असून तो सध्या फरार आहे. प्रशांतवर राजकीय आशीर्वाद असून तो अलीपूर ग्रामपंचायतीचा सभापती आहे, अशी माहितीही समोर आली आहे.

पोलिस तपासानुसार, बनावट देशी दारू बीड जिल्ह्यात तयार होऊन वर्ध्यातील अलीपूर येथे आणली जाते. तेथे ती बाटलीबंद करून विविध ट्रक व खासगी वाहनांच्या साहाय्याने चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी, चिमूर, सावली आदी तालुक्यांमध्ये पाठवली जाते. प्रत्येक पेटी एक हजार 800 रुपये दराने विकली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे संपूर्ण रॅकेट अनेक महिन्यांपासून सुरू असून, यामध्ये अनेक स्थानिकांची संलग्नता असल्याचा संशय आहे.

दारू प्रयोगशाळेत तपासणीसाठी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बल्लारपूर शहरातील प्रसिद्ध मिलिंद वाईन शॉपवर धाड टाकून ती पंधरा दिवसांसाठी सील केली आहे. त्या दुकानातून मिळालेल्या बनावट दारूच्या पेट्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्याआधी तीन महिन्यांपूर्वी गोंडपिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारची बनावट दारू पकडण्यात आली होती, ज्याचे धागेदोरे याच दुकानापर्यंत पोहोचत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने 2 मे रोजी चिमूर तालुक्यातील मौजा बंदर शिवापूर येथे छापा टाकून लाखो रुपयांची बनावट देशी दारू जप्त केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात हे रॅकेट उघडकीस आले. प्रशांत चंदनखेडेने बोगस दारूच्या तस्करीत मोठे जाळे निर्माण केले असून, त्याला स्थानिक राजकीय संरक्षण असल्याचेही बोलले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकांना नियमित कारवाईचे निर्देश दिले असून, तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या तयार करून प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले की, “प्रशांत चंदनखेडे याचा शोध सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. बनावट दारूच्या रॅकेटमधील सर्व सूत्रधारांवर कडक कारवाई केली जाईल.

बनावट दारू प्रकरणात समोर येत असलेले धक्कादायक तपशील हे या अवैध धंद्याच्या मागे असलेल्या सखोल नेटवर्कची साक्ष देतात. प्रशासकीय यंत्रणा आता खंबीर पावले उचलत असून, लवकरच या रॅकेटला कायमस्वरूपी आळा बसण्याची शक्यता आहे. विदर्भातील जनतेनेही सजग राहून अशा अवैध कृत्यांविरोधात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!