
चंद्रपुरात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या हजार कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा कामांवर भ्रष्टाचाराची काळी छाया पडली आहे. कार्यकारी अभियंता यांना चार लाख 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने संपूर्ण यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या “जल जीवन मिशन” अंतर्गत सुरू असलेल्या हजार कोटी रुपयांच्या जलसंपदा प्रकल्पांवर भ्रष्टाचाराचे मोठे सावट निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांना चार लाख 20 हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आले. त्यानंतर विभागात चाललेल्या सर्वच कामांवर संशयाची छाया पडली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हर्ष बोहरे यांच्यासह वरिष्ठ सहायक सुनील गुंडावार आणि परिचर मतीन शेख या तिघांना शुक्रवारी सापळा रचून रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, हे तिन्ही अधिकारी एका कंत्राटदाराकडून केवळ पाच गावांच्या 43 लाख रुपयांच्या बिल मंजुरीसाठी चार लाख 20 हजार रुपयांची लाच स्वीकारत होते. या अटकेनंतर तिघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सध्या पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
बहुसंख्या कामांतून लाभ
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष बोहरे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक कामासाठी कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतल्याशिवाय बिल मंजूर केले जात नव्हते. बिल मंजुरीपूर्वीच लाच स्वीकारण्याचा हा नित्यक्रम बनला होता. जिवती, कोरपना, राजुरा, गोंडपिंपरीसह इतर तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या सुमारे एक हजार 290 योजनांपैकी बहुसंख्य कामांतून बोहरे यांना आर्थिक लाभ मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात फक्त हर्ष बोहरेच नव्हे, तर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधींचेही हात असल्याची जोरदार चर्चा आहे. लाच प्रकरणानंतर कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्याकडून तात्काळ पदभार काढून घेतला असून, त्यांचा कार्यभार आता उपअभियंता बारहाते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
Vijay Wadettiwar : रुग्णालयातील प्रकरणानंतर, दिवंगत लता मंगेशकर यांच्यावरही आरोप
सदर गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यात सध्या 700 कोटी रुपयांच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कामे सुरू असल्याचे सांगितले. ही सर्व कामे ग्रामीण भागात सुरू असून, त्यावर आता चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर हर्ष बोहरे यांच्या चंद्रपूरसह इतर ठिकाणच्या निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यांचे आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची सखोल चौकशी केली जात आहे.
सखोल चौकशी
ग्रामीण भागात स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा उद्देश असलेल्या “जल जीवन मिशन”सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर अशा भ्रष्टाचाराच्या सावल्या पडल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी आता नागरिक, सामाजिक संस्था आणि स्थानिक नेत्यांकडून केली जात आहे. हर्ष बोहरे यांचा पर्दाफाश झाल्यानंतर “जल जीवन मिशन”च्या प्रामाणिक अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील काळात हे प्रकरण किती खोलवर जाते आणि आणखी कोणते अधिकारी व लोकप्रतिनिधी यात अडकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.