
गळतीमुळे थांबलेली अमरावतीची जलवाहिनी आता पुन्हा धावायला सज्ज झाली आहे. बुधवारी 14 मेपासून शहराचा नियमित पाणीपुरवठा पूर्ववत होणार असून, मजीप्राने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण केलं आहे.
अमरावती आणि बडनेरा शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बुधवार 14 मेपासून शहराचा नियमित पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सिंभोरा-अमरावती जलवाहिनीत लागलेल्या गळतीचे दुरुस्ती काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. युद्धपातळीवर हे काम राबवले जात आहे.

मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून अमरावती व बडनेरा शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी सिंभोरा ते अमरावती दरम्यान एक हजार 500 मिलिमीटर व्यासाची पीएससी जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. ही जलवाहिनी वडगाव माहोरे फाट्यानजीक (रहाटगाव रिंग रोड) रॉयल ओक शोरूमजवळ गळतीमुळे निकामी झाली होती. त्यामुळे 12 आणि 13 मे रोजीचा पाणीपुरवठा पूर्णतः थांबवावा लागला.
तांत्रिक शोध
गेल्या रविवारी रात्रीपासूनच मजीप्राने तातडीने दुरुस्तीकार्य हाती घेतले. स्थानिक कंत्राटदारांच्या माध्यमातून गळती दुरुस्त करण्याचे काम दोन प्रमुख टप्प्यांमध्ये पार पडले. प्रथम, गळतीमुळे परिसरात साचलेले पाणी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर लिकेजचे नेमके ठिकाण शोधण्याचे काम झाले. हे ठिकाण जलवाहिनीच्या पाइपमधून आहे की दोन पाइपांच्या सॉकेटजवळ, याबाबतची स्पष्टता येताच दुरुस्तीची योग्य पद्धत अवलंबली जाणार आहे.
उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून आमची टीम रात्रीचा दिवस करून कार्यरत आहे. पाइप बदलावा लागेल की केवळ रबरी रिंग बदलून काम होईल, यावर तांत्रिक निर्णय घेण्यात येईल. हे सर्व काम मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, असा आमचा ठाम विश्वास आहे. जर ही गळती दुरुस्त न करता पाणीपुरवठा सुरू ठेवला असता, तर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला असता. तसेच नागरिकांपर्यंतही आवश्यक पाणी पोहोचले नसते. त्यामुळे दुरुस्तीपूर्वी पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे मजीप्रा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सक्षमतेने मार्ग
शहरातील सर्व नागरिकांना या तांत्रिक अडचणीबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांनी पाण्याचा साठा करून ठेवावा व आवश्यकतेनुसार काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभारी आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होताच नियमित स्वरूपात जलसेवा पुनः सुरू होईल, अशी ग्वाही दिली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जलप्राधिकरणाच्या यंत्रणेने दाखवलेली तत्परता आणि बांधिलकी प्रशंसनीय आहे. अमरावतीकरांसाठी ही केवळ पाण्याच्या पुरवठ्याची बातमी नाही, तर संकटातही प्रशासन सक्षमतेने मार्ग काढते, याचा ठोस प्रत्यय आहे.