उत्तर नागपुरात महापालिका निवडणुकीसाठी रंगतदार लढत सज्ज आहे. भाजप, बसप आणि काँग्रेस यांच्यातील चुरस मतदारसंख्येच्या वाढीमुळे आणखी तीव्र होणार आहे.
नागपूर शहरातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. ही रचना 2017 मधील निवडणुकीतील प्रभाग रचनेसारखीच आहे. त्यात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. प्रशासनाने सूचना आणि हरकती मागवल्या असल्या, तरी मागील अनुभव पाहता ही प्रारूप रचनाच अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच प्रभाग रचनेच्या आधारावर निवडणूक होईल, असे संकेत मिळत आहेत. शहरात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून, 38 प्रभागांमधून 151 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यापैकी उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघात प्रभाग क्रमांक 1 ते 7 आणि 9 असे एकूण आठ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जातात, म्हणजेच एकूण 32 नगरसेवक येथून निवडून येतात.
उत्तर नागपूर हा मतदारसंघ काँग्रेससाठी विधानसभा निवडणुकीत सातत्याने यशस्वी ठरला आहे. 2014 चा अपवाद वगळता, काँग्रेसने येथे आपली विजयी पताका फडकवली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत चित्र वेगळे दिसते. येथे भाजप नगरसेवकांच्या संख्येत आघाडीवर राहिला आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 17, बहुजन समाज पक्षाने 10, तर काँग्रेसने 7 नगरसेवक निवडून आणले होते. यावरून धर्मनिरपेक्ष मतांचे विभागणी होत असल्याचे स्पष्ट होते. विधानसभा निवडणुकीत ही मते काँग्रेसकडे एकवटतात, परंतु महापालिका निवडणुकीत ती काँग्रेस आणि बसप यांच्यात विभागली जातात, ज्याचा फायदा बसपला अधिक होतो.
Chandrashekhar Bawankule : मराठा समाजाला उभारी, ओबीसी हक्कांना बळ
धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन
उत्तर नागपूरातील राजकीय समीकरणे पाहता, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन निवडणुकीचा निकाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. 2017 मधील आकडेवारीनुसार, भाजपची मते विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत सातत्याने त्यांच्याच बाजूने राहतात. ज्यामुळे त्यांची नगरसेवकांची संख्या अधिक राहिली आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि बसप यांच्यातील मतविभागणीमुळे भाजपला अप्रत्यक्ष फायदा होतो. उदाहरणार्थ, जर काँग्रेस आणि बसपची मते एकत्रित केली, तर त्यांची एकूण नगरसेवक संख्या भाजपपेक्षा जास्त होते. यामुळे उत्तर नागपुरात बसपचे वाढते आव्हान भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.
2017 मधील निवडणुकीत उत्तर नागपुरातील प्रभागनिहाय निकाल पाहता, प्रभाग क्रमांक 1, 4 आणि 5 मध्ये भाजपने सर्व चार जागा जिंकल्या होत्या. प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेसने चारही जागा जिंकल्या, तर प्रभाग 6, 7 आणि 9 मध्ये बसपने अनुक्रमे 4, 3 आणि 3 जागा जिंकल्या. प्रभाग 3 मध्ये भाजपने 3 आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली होती. यंदा प्रभाग रचना 2017 प्रमाणेच आहे. परंतु मतदारसंख्येत वाढ झाली आहे. ही वाढीव मतदार कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकतील, यावर निकाल अवलंबून असेल. सर्व पक्षांचे मतदार या वाढीव संख्येत असल्याचे गृहीत धरले, तर उत्तर नागपुरातील निवडणूक चित्र अनिश्चित आणि रंगतदार असेल.
Yashomati Thakur : स्वस्त परदेशी कापसाने शेतकऱ्यांचा घेतला बळी
वाढलेली मतदारसंख्या आणि प्रभाग रचनेतील सातत्य यामुळे पक्षांना आपली रणनीती नव्याने आखावी लागणार आहे. भाजपला आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी मतांचे एकीकरण महत्त्वाचे ठरेल, तर बसप आणि काँग्रेसला धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी एकमेकांशी समन्वय साधावा लागेल. उत्तर नागपूरातील ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत नसून, पक्षीय राजकारणातील ताकद आणि रणनीतीचा कस पणाला लावणारी ठरणार आहे. येथील निकाल शहराच्या राजकीय समीकरणांवरही परिणाम करू शकतात.
