महाबोधी महाविहार मुक्तीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी निर्णायक भूमिका घेतली आहे. बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बोधगयामध्ये होणाऱ्या आंदोलनाने नव्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आपली भूमिका अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती येत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील. यासाठी 16 आणि 17 एप्रिल रोजी ते बोधगया येथे उपस्थित राहणार आहेत. सर्व बौद्ध बांधवांनी या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे.
बिहार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी उभे राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महाबोधी महाविहार हा जागतिक वारसा स्थळ असला तरी, तो बौद्ध समाजाच्या ताब्यात नसल्याने अनेक वर्षांपासून त्याच्या स्वामित्वावरून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला नवा बळ देण्यासाठी आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंबेडकर यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Harshwardhan Sapkal : गुन्हेगारी वाढली, पण गृह खात्याचा मोह काही सुटेना
अधिकारांसाठी लढाई
प्रकाश आंबेडकर यांनी बौद्ध समाजाच्या अन्यायाला वाचा फोडत महाबोधी महाविहार मुक्तीचा मुद्दा अधिक तीव्र केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी यापूर्वीही या प्रश्नावर आवाज उठवला होता. मात्र, आता हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
महाबोधी मंदिर बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. मात्र, भारतीय बौद्धांना त्यांच्या स्वतःच्या पवित्र स्थळी संपूर्ण हक्क मिळत नाहीत, ही स्थिती अन्यायकारक असल्याचे आंबेडकर यांनी याआधीही ठासून सांगितले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली होणारे हे आंदोलन केवळ धार्मिक हक्कांसाठी नाही. वारसाच्या पुनर्स्थापनेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी एक मोठे पाऊल आहे.
नवा राजकीय सूर
प्रकाश आंबेडकर यांचे हे आंदोलन राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण मानले जात आहे. बहुजन राजकारणात आंबेडकर यांची भूमिका नेहमीच प्रभावी राहिली आहे आणि महाबोधी महाविहाराच्या मुद्द्यावर त्यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रीय पातळीवर हा विषय अधिक गाजणार आहे.
बिहारमध्ये होणाऱ्या या आंदोलनात देशभरातील बौद्ध समाज मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ बौद्ध समाजच नव्हे, तर सामाजिक न्यायाच्या मुद्यांवर काम करणाऱ्या विविध संघटनांचे याकडे लक्ष लागले आहे. या लढ्यामुळे बौद्ध समाजाच्या ऐतिहासिक मागण्यांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
