भाजप आमदार संजय कुटे यांचे चालक पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूवरुन त्यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सवाल केला आहे.
पहेलगाममधल्या भगिनींच्या सिदूरसाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं, पण माझं सिंदूर? माझं कुणी विचारलं का? असा जळजळीत सवाल बुलढाण्याच्या सुनिता देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. भावनिक संतप्तीने भरलेली ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सुनिता देशमुख यांचे पती पंकज देशमुख हे गेली 20 वर्ष भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक म्हणून ते कार्यरत होते. 3 मे रोजी त्यांचा मृतदेह गावाजवळच्या शेतात संशयास्पद परिस्थितीत आढळून आला.
पहिल्या नजरेला ही आत्महत्या वाटावी अशी स्थिती होती, पण त्यांचे शरीर पाहिल्यावर चित्रच बदललं. शरीरावर अनेक जखमा आढळल्या.आपल्या पोस्टमध्ये सुनिता देशमुख यांनी फडणवीसांना थेट विचारलं पहेलगाममध्ये ऑपरेशन सिंदूर राबवता, पण माझं सिंदूर काय कमी आहे? माझ्या पतीचा मृत्यू तोही आपल्या गावात, आणि तरीही न्याय नाही? माझ्या दोन चिमुकल्यांना कोण उत्तर देणार? सुनिता देशमुख यांचा हा आक्रोश केवळ भावनिक नाही, तर व्यवस्थेच्या दिशेने एक सणसणीत सवाल आहे. त्यांचा दावा आहे की, पतीने आत्महत्या केली नाही, तर ही हत्या आहे.
तपासावर अविश्वास
दाव्याला आधार देणारे अनेक पुरावे असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जळगाव जामोद पोलिसांवर मला अजिबात विश्वास नाही. त्यांनी जे शवविच्छेदन केलं, ते अपूर्ण आहे. तपासात पारदर्शकता नाही, असा आरोप करत त्यांनी CID चौकशीची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकरण अधिकच गडद होण्याची शक्यता आहे.
पंकज देशमुख हे केवळ वाहनचालक नव्हते, तर भाजपच्या प्रचार, निवडणूक कामकाजात वर्षानुवर्षं अग्रेसर होते. पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची अवस्था अशी का? हाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. माझा नवरा गेल्यानंतर फक्त माझं सिंदूरच नाहीस झालं, तर माझा विश्वास, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझी अकरा वर्षांची मुलगी, आठ वर्षांचा मुलगा त्यांचं काय? त्यांना कुठे न्याय मिळणार? असं सुनीता यांनी सांगितले. या प्रकरणात पंकज देशमुख यांच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून सादर केलं गेलं.
सुनिता देशमुख यांचं म्हणणं आहे ही संपूर्णपणे आखलेली हत्या आहे. त्यांच्या शरीरावर असलेल्या जखमा, घटनास्थळाची स्थिती आणि प्रशासनाचा दृष्टीकोन हे सर्व तपासणीसाठी महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड हादरलं होतं. आता पंकज देशमुख प्रकरणामुळे बुलढाणा हादरत आहे. यामागे कुणाचं राजकीय बळ वापरलं जातंय का? हे एक गंभीर संशयाचं गाठोडं आता पोलिसांसमोर आहे.
