
बुलढाण्यात भाजप आमदार संजय कुटे यांनी होळीच्या दिवशी अनोख्या पद्धतीने सण साजरा केला. संपूर्ण मतदारसंघ सायकलवर फिरत त्यांनी लोकांशी संवाद साधला.
होळीचा सण हा फक्त रंगांचा उत्सव नसतो, तर तो सामाजिक आणि राजकीय समीकरणांनाही नवे रंग देऊन जातो. यंदाच्या होळीच्या सणातही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित वळणे पाहायला मिळाली. कुणी एकमेकांवर टीका केली, तर कुणी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे बुलढाण्यात घडलेली एक आगळीवेगळी घटना.
बुलढाण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी या होळीच्या सणात राजकीय रंगांची उधळण करत एक अनोखा संदेश दिला. होळीच्या निमित्ताने त्यांनी शहरभर सायकलवरून फिरत सणाचा आनंद घेतला. मात्र, ही साधी सायकल रॅली नव्हती. विशेष म्हणजे, सायकल हे समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून नक्की कोणता संदेश दिला, याबद्दल उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

कार्यकर्त्याचा नवा प्रयोग
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजप आमदार आणि माजी मंत्री संजय कुटे यांचा या होळीच्या निमित्ताने अनोखा अंदाज समोर आला. नेहमी काहीतरी वेगळं करण्यासाठी ओळखले जाणारे संजय कुटे यंदा होळी साजरी करण्यासाठी सरळ सायकलवर सवार झाले. त्यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा दौरा सायकलवरून केला, आणि यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.
त्यांच्या या अनोख्या शैलीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये सुरुवातीपासूनच मतभेद आहेत. दोघांचेही राजकीय विचारधारेत मोठी तफावत आहे. या दोन पक्षांमध्ये कधीच गोड संबंध राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत भाजप नेत्यांनी सायकलवरून दौरा करणे म्हणजे एक अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.
Congress : नानांच्या ‘ऑफर’वर वडेट्टीवारांनी लावली ‘सस्पेन्स’ची मोहर
सायकलचा संबंध
सायकल ही एक साधी वाहतूक साधन असली तरी तिचं राजकीय अर्थही मोठं आहे. समाजवादी पक्ष आपलं चिन्ह म्हणून सायकलचा वापर करतो कारण ती सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा परिस्थितीत भाजप नेत्यांनी सायकलवरून सण साजरा करणं म्हणजे समाजवादी पक्षाला अप्रत्यक्षपणे डिवचण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशीही कुजबुज सुरू झाली आहे.
होळी हा सण स्नेहभाव आणि सौहार्द यांचे प्रतिक असतो. पण यंदाच्या होळीत राजकीय रंग मिसळले गेले आहेत. संजय कुटे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘चला जाता हूं किसी की धुन में’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या या अनोख्या स्टाइलला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
चर्चेला उधाण
भाजपच्या या नव्या प्रयोगामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. राजकीय खेळी आणि संदेश यामध्ये सध्याचं वातावरण कितपत बदलेल, हे आगामी काळच सांगेल. पण यंदाची होळी ही फक्त गुलाल आणि रंगांची नव्हे, तर राजकीय रंगांनीही न्हालेली ठरली, हे मात्र निश्चित.