
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात लग्नाच्या वरातीत तलवार हातात घेऊन ठेका धरताना दिसले. यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली एक वेगळीच हवा वाहताना दिसतेय. तलवारीच्या तेजाचा मोह नेत्यांच्या डोक्यावर चढलेला आहे. काहींना तर वाटू लागलंय की भाषणं, रॅली, सभांपेक्षा तलवार फिरवणं जास्त प्रभावी ठरतंय. अगदी असा प्रभाव, की राजकारण थोडं बाजूला ठेवून नृत्य-मंच गाजवणं हाच नवा ट्रेंड झाला आहे. या नव्या ट्रेंडचा झगमगता नमुना बुलढाण्याच्या मेहकरमध्ये पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी एका लग्नाच्या वरातीत असा काही जलवा दाखवला की उपस्थितांची डोळ्यांत प्रकाश पडला आणि नेटिझन्सनी मोबाईल स्क्रीनवर.
हातात तलवार, कानात बँड बाजाचं गाणं, आणि पायात नाचाचे थिरकते ठोके. खरात यांचा हा जलवा सोशल मीडियावर तलवारीच्या धारेसारखा झपाट्यानं पसरला आहे. गमतीशीर बाब म्हणजे सिद्धार्थ खरात हे एकेकाळी प्रशासकीय सेवेत होते. त्यामुळे कायद्याची बारीक-सारीक माहिती त्यांना ठाऊक आहे. पण लोकप्रतिनिधी होऊनही त्यांनी असं वर्तन केलं, हे पाहून अनेकांचं भुवया उंचावल्या. याआधीही महाराष्ट्रात अशा प्रकारचं वर्तन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता खरात यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई होणार का, हाच प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय.

Chandrashekhar Bawankule : देवस्थान जमिनींच्या व्यवहारांना तातडीचा ब्रेक
लोकप्रतिनिधीच कायदाभंगात
यापूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. त्याच धर्तीवर खरात यांचा हा तलवारीसह नाच सुद्धा आर्म ऍक्टच्या चौकटीत बसतो का, याचा आता प्रशासन विचार करतंय. या प्रकारावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात टीकेचा सूर उमटतो आहे. हातात तलवार घेऊन अशा सार्वजनिक ठिकाणी नाच करणं म्हणजे कायद्याचा उघड उघड अपमानच, असं अनेकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे याआधीही मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर तलवार दाखवल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता.
तलवार हा भारतीय संस्कृतीचा मानबिंदू असला तरी सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करणे, तोही बिनधास्त पद्धतीनं, हा कायद्याचा भंग मानला जातो. विशेषतः जेव्हा तो एखाद्या लोकप्रतिनिधींकडून केला जातो, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणण्याचा एक प्रकार समजला जातो. आता मोठा प्रश्न असा आहे की, खरात यांच्यावर गुन्हा दाखल होईल का? की व्हायरल व्हिडीओ’चा आवाज बंद पडल्यावर सगळं निवळून जाईल? प्रशासन आणि पोलिस काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.