उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील तिढा अखेर सुटला असून एनडीएने विजयाची बाजी मारली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे देशाचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत.
21 जुलैला देशाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. त्यांच्या अचानक राजीनाम्याने सर्वांचे लक्ष उपराष्ट्रपती पदाच्या नव्या उमेदवाराकडे लागले होते. अखेर, ही उत्सुकता संपली आणि एनडीए सरकारने पुन्हा एकदा आपल्या धक्कातंत्राने सर्वांना आश्चर्यचकित केले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत देशाचे नवीन उपराष्ट्रपती बनण्याचा मान मिळवला. या विजयाने एनडीए सरकारच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
राधाकृष्णन यांचे अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधानांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वच सरसावले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत राधाकृष्णन यांनी 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीची मते मिळवली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत 15 मते बाद ठरली. 782 सदस्यांच्या निवडणूक मंडळात 543 लोकसभा आणि 239 राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे. राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. यामागे इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी गुप्तपणे एनडीएला साथ दिल्याची चर्चा आहे. ही निवडणूक केवळ संख्यांचा खेळ नव्हता, तर राजकीय रणनीती आणि विश्वासाचा विजय होता.
एनडीएच्या एकजुटीचा विजय
राधाकृष्णन यांच्या विजयाने एनडीएच्या एकजुटीचे आणि रणनितीचे बळ पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सी.पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास हा प्रेरणादायी आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी खासदार, भाजप प्रदेशाध्यक्ष, कोयर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच झारखंड आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान राष्ट्रीय स्तरावर अतुलनीय आहे. त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीला सलाम करताना, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या खास शैलीत राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले. डॉ. फुके म्हणाले, सी.पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
राधाकृष्णन अनुभव आणि समर्पण यामुळे ते राष्ट्रसेवेत नव्या उंची गाठतील, याची मला खात्री आहे. डॉ. फुके यांनी आपल्या नेहमीच्या उत्साही आणि प्रेरक शैलीत राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. फुके यांनी राधाकृष्णन यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकताना, त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला नव्या दिशेने नेण्याची क्षमता असल्याचेही नमूद केले. राधाकृष्णन यांचा हा विजय केवळ वैयक्तिक यश नसून, एनडीएच्या एकजुटीचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा परिपाक आहे. या विजयाने महाराष्ट्रातही उत्साहाचे वातावरण आहे. कारण राज्यपाल आता देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एकावर विराजमान झाले आहेत. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली देशाला नव्या दिशेने प्रगती करता येईल, अशी आशा सर्वत्र व्यक्त होत आहे.
