
महायुती सरकारमध्ये अलीकडेच रूजू झालेल्या नव्या मंत्र्यांना दालनाचं वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये नितेश राणे, इंद्रनील नाईक यांचाही समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आता पदभार स्वीकारत आहेत. महायुती सरकारमधील 18 मंत्र्यांची विस्तारानंतरही पदभार स्वीकारला नव्हता. त्यापैकी काही मंत्री आता रूजू होत आहेत. भाजपच्या कोट्यातून मंत्री झालेले नितेश राणे यांना मंत्रालयातील मुख्य इमारतीत स्थान देण्यात आलं आहे. राणे हे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील मुख्य इमारतीत असतील. अतिरिक्त मुख्य सचिव सीमा व्यास यांचे दालनही येथे राहणार आहे. त्यामुळं दालनाची जागा वाढविण्यात येणार आहे.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे दुसऱ्या मजल्यावरील कक्षात असतील. त्यांना मंत्रालयातील विस्तारित इमारतीत कक्ष देण्यात आलं आहे. पंकज भोयर यांच्या दालनाच्या जागेवर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा काही भाग कार्यरत होता. आता हा विभाग मंत्रालयाच्या मुख्य इमारती समोर असलेल्या प्रतिक्षा कक्षाच्या जागेत हलविण्यात आला आहे. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना विधान भवनातील कक्ष देण्यात आला आहे. इंद्रनील नाईक यांना तात्पुरत्या स्वरूपात कक्ष देण्यात आला आहे. बौर्डीकर यांना न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासाठी असलेला कक्ष देण्यात आले आहे. नाईक यांचा कक्ष मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या सातव्या मजल्यावर असेल. संदीप शिंदे यांचा कक्ष आता सामान्य प्रशासन विभागात असेल.

अनेकांकडून Vastu अनुसार बदल
महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपल्या कक्षांमध्ये वास्तुशास्त्रानुसार बदल केले आहेत. कार्यालयात वास्तुदोषाच्या भीतीपोटी अनेक मंत्र्यांनी आपल्या दालनामधील अंतर्गत रचनेमध्ये बदल केले आहेत. काही मंत्र्यांनी मजलेही बदलले आहेत. अनेक मंत्र्यांनी आपल्या दालनामध्ये विधिवत पूजाअर्चा केली. 42 मंत्र्यांपैकी 33 मंत्र्यांनी आत्तापर्यंत आपल्या दालनात प्रवेश केला आहे. त्यानंतर वास्तुप्रमाणे दालने व बंगल्यांमध्ये बदल सुरू आहेत. सहा मंत्र्यांनी वास्तुतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्यांच्या दालनाची फेररचना करण्यात येत आहे.
संजय शिरसाट यांनी वास्तुतज्ज्ञ डॉ. रविराज अहिरराव यांचा सल्ला घेतला आहे. अहिरराव यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही 14 मंत्र्यांची दालने व बंगल्याचा वास्तुशास्त्राप्रमाणे बदल केला होता. त्यांच्या सल्ल्यानं अनेक मंत्री व आमदार बदल करून घेत आहेत. एक आठवडा उलटल्यानंतरही नऊ मंत्र्यांनी दालनांचा ताबा घेतलेला नाही. अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री सध्या विदेशात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील दालनातून कामकाज सुरू केलेले नाही. त्यामुळं लवकरच मंत्री नवीन दालनातून कामकाज सुरू करतील असं सांगण्यात येत आहे.