राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री अशोक उईके यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ज्या सभागृहात कार्यक्रम होणार होता. तिथे राजकीय कार्यक्रम घेण्यास शासनानेच बंधनकारक केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी आमदार किशोर जोरगेवार यांना नकार दिला.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार, चंद्रपुरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात राजकीय पक्षांना कार्यक्रम घेण्यास बंधनकारक आहे. तरीही जिल्ह्याचे आमदार जोरगेवार यांनी भाजपा कार्यकर्ता मेळावा व पालकमंत्री सत्कार कार्यक्रमाचे आयोजन या सभागृहात केले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांना ही बाब माहिती होताच, त्यांनी आक्षेप घेतला आणि येथे राजकीय कार्यक्रम घेऊ नका, असे स्पष्ट सांगत सभागृह देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ऐनवेळी आता सत्कार सोहळा आदिवासी संघटनाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. दरम्यान आमदार जोरगेवार यांनी महानगर पदाधिकारी व माजी पालकमंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने या कार्यक्रमावर बहिष्काराचे सावट आले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
Republic Day निमित्त केले आयोजन
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री .डॉ.अशोक उईके उद रविवार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभासाठी 25 जानेवारीलाच चंद्रपुरात दाखल होत आहेत. पालकमंत्री डॉ. उईके यांच्या प्रथम आगमनानिमित्त चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून भाजपा कार्यकर्ता मेळावा व पालकमंत्री सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सत्कार सोहळ्याचे फलक शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार होता. परंतु या सभागृहात राजकीय कार्यक्रम घेण्यास शासनाच्याच आदेशानुसार सक्त मनाई आहे.
या कार्यक्रमाबद्दल जिल्हाधिकारी विनय गौडा यांना माहिती झाली. त्यांनी लगेच हा राजकीय कार्यक्रम घेता येणार नाही, असे आमदार जोरगेवार यांना स्पष्ट सांगितले. पालकमंत्री सत्कार सोहळा हा एखाद्या संस्थेच्या माध्यमातून घेता येईल. तेव्हा भाजपाला सभागृह देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी आमदार जोरगेवार यांच्यावर भाजपा कार्यकर्ता मेळावा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. तर आदिवासी संघटनेच्या माध्यमातून सत्कार सोहळ्यासाठी सभागृह नोंदणीसाठी पत्र देण्यात आले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजनासाठी शहराध्यक्ष राहुल पावडे आणि माजी पालकमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे पावडे आणि पदाधिकारी या मेळाव्यावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती आहे. पालकमंत्री उईके यांच्या शहरातील प्रथमच आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रम चांगलाच वादात अडकला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आमदार जोरगेवार यांनी बैठका घेतल्या. परंतु त्या बैठकांनाही शहराध्यक्ष आणि बहुसंख्य माजी नगरसेवकांनी हजेरी लावली नाही.
