चंद्रपूरमध्ये रविवारी रात्री काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली.
महाराष्ट्राचं राजकारण हे केवळ सत्तेच्या संघर्षापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते आता थेट हिंसाचाराच्या पातळीवर जात असल्याचं दिसत आहे. सत्ता असो किंवा विरोधक राजकीय नेत्यांना धमक्या, हल्ले आणि कटकारस्थानं यांचं जणू काही छुपं राजकारणच सुरू झालंय. अगदी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. एवढंच नव्हे, तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारं एक पत्रही मिळालं होतं. पाकिस्तानमधून मंत्रालय उडवून देण्याचा इमेलही आला होता.
संपूर्ण घटनेला पूर्ण विराम लागलाही नसतांना या पार्श्वभूमीवर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस शहराध्यक्षाच्या घरावर थेट गोळीबार करण्याचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात यामुळे खळबळ उडाली आहे. हा हल्ला राजकीय वादातून झाला की यामागे काही वेगळंच कारण आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.
Maharashtra : महायुतीची ‘बजेट मुव्ही’ दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या पडद्यावर
गॅलरीत आढळली गोळी
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या निवासस्थानी अज्ञात इसमांनी गोळीबार केला. रात्री आठ वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेने संपूर्ण घुग्घुस शहरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः, एक गोळी घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत आढळून आली, ज्यामुळे हा हल्ला किती गंभीर होता, हे स्पष्ट होते.
रविवारी रात्री राजू रेड्डी घरी परतले असताना वरच्या माळ्यावर अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यावेळी रेड्डी खालील माळ्यावर होते. वरच्या माळ्यावर काही भाडेकरू राहतात. हा प्रकार घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची तपासणी केली. या घटनेनंतर घुग्घुसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते रेड्डी यांच्या घरासमोर जमा झाले आहेत.
बाईकस्वारांनी घडवली दहशत
हल्ल्यामध्ये दोन अज्ञात युवकांचा समावेश होता. ते बाईकवरून आले आणि त्यांनी थेट रेड्डी यांच्या घरावर गोळ्या झाडल्या. हे कृत्य इतक्या वेगात झाले की कोणीही काही समजण्याच्या आतच हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत आहे.
सगळ्यात गंभीर बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा मंत्रालय, सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि हल्ल्यांनंतरही पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी कोणताही ठोस उपाययोजना अमलात आणलेला दिसत नाही. यावरूनच प्रशासनाची निष्क्रियता आणि बेफिकिरी स्पष्ट होते.