चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अनेक गटांत थरारक मतमोजणी झाली. काही ठिकाणी विजयाचा फरक केवळ एका मताचा राहिला.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने यंदा अत्यंत अटीतटीचा रंग घेतला. काही ठिकाणी अवघ्या एका मताने विजय निश्चित झाला, तर काही ठिकाणी ईश्वरचिठ्ठीच्या आधारावर निकाल लागला. काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये सत्ता मिळविण्याच्या स्पर्धेला कमालीची रंगत आली. या निवडणुकीत एकूण 21 संचालकांची निवड करण्यात आली. यातील 13 संचालक आधीच विनविरोध निवडून आले होते. उर्वरित 8 जागांसाठी मतदान पार पडले.
गुरुवारी झालेल्या मतदानानंतर शुक्रवारी चांदा इंडस्ट्रियल सोसायटीत सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. पहिलाच निकाल चंद्रपूर तालुका ‘अ’ गटाचा लागला. यामध्ये काँग्रेसचे दिनेश चोखारे यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवत सुभाष रघाताटे यांचा पराभव केला. चोखारे यांना 15, तर रघाताटे यांना 14 मते मिळाली. ही लढत प्रचंड रंगतदार ठरली.
रंगतदार संघर्ष
राजुरा ‘अ’ गटात माजी आमदार आणि भाजपचे उमेदवार सुदर्शन निमकर यांना ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून विजय प्राप्त झाला. निमकर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी नागेश्वर ठेंगणे यांना प्रत्येकी 12 मते मिळाल्याने निकाल चिठ्ठीवर गेला. शेवटी नियतीने निमकर यांच्या बाजूने निर्णय दिला. सावली येथून ‘ब’ गट 2 मधून रोहित बोम्मावार यांनी विक्रमी 213 मते मिळवून बाजी मारली. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना केवळ 67 व 9 मते मिळाली. एससी गटात ललित मोटघरे यांनी 532 मतांसह दणदणीत विजय प्राप्त केला. त्यांचे विरोधक बांबोळे यांना तुलनेत खूपच कमी मते मिळाली. एसटीव्ही/जेनटी गटात यशवंत दिघोरे यांनी 372 मतांसह बाजी मारली. विद्यमान संचालक दामोदर रूयारकर यांना केवळ 266 मते मिळाली.
निवडणुकीतील सर्वात चुरशीची लढत ओबीसी गटात पाहायला मिळाली. श्यामकांत थेरे, गजानन पाथोडे व सूर्यकांत खनके यांच्यात तिरंगी लढत झाली. प्रारंभी थेरे शंभर मतांनी आघाडीवर होते. मात्र, चिमूर व नागभीड तालुक्यांतील जोरदार मतदानामुळे पाथोडे यांनी 39 मतांची आघाडी घेतली. नंतर पोंभूर्णा, मूल व गोंडपिंपरीत थेरे यांनी काही मते घेतली, परंतु आघाडी पाटवण्यात अपयश आले. फेरमतमोजणीत थेरे यांच्या मतांमध्ये एक मत वाढले आणि एक मत अवैध ठरले. परिणामी पाथोडे यांचा दोन मतांनी निसटता विजय निश्चित झाला. अंतिमतः पाथोडे यांना 300, थेरे यांना 298, तर खनके यांना 242 मते मिळाली. या चुरशीच्या लढतीत चिमूर व नागभीड तालुक्यांनी निर्णायक भूमिका बजावली.
Vijay Wadettiwar : शेतकरी, शिक्षक, बहिणी; महायुतीच्या सत्तेत कुणालाच न्याय नाही
विजयी उमेदवारांचे स्वागत
निवडणुकीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे नेते विजयी उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. काँग्रेसकडून खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. दुसरीकडे भाजपकडून आमदार कीर्तीकुमार भांगडिया व आमदार किशोर जोरगेवार यांनी आपले विजयी उमेदवार उचलून धरले. निवडणुकीत 13 संचालक आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये रवींद्र शिंदे, संतोष रावत, संदीप गड्डमवार, डॉ. अनिल वाढई, संजय डोंगरे, विलास मोगरकर, उल्हास करपे, गणेश तर्वेकर, दामोदर मिसार, खासदार प्रतिभा धानोरकर, नंदा अल्लूरवार, विजय बावणे व आवेश खान पठाण यांचा समावेश आहे.