हरवलेली नाती, हरवलेली माणसं अखेर चंद्रपूर पोलिसांच्या ऑपरेशन शोधमुळे पुन्हा एकत्र आली. 10 दिवसांच्या मोहिमेत अनेक बेपत्ता व्यक्ती शोधून काढत पोलिसांनी माणुसकीचा नवा इतिहास रचला.
चंद्रपूर जिल्ह्यात एक हृदयस्पर्शी आणि सामाजिकदृष्ट्या परिणामकारक मोहीम यशस्वी झाली आहे. हरवलेल्या, अपहरण झालेल्या, पळवून नेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तींना पुन्हा त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ऑपरेशन शोध’ या विशेष अभियानाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत या मोहिमेची घोषणा करताना स्पष्ट केलं होतं की, राज्य शासनाकडून अशा उपक्रमांद्वारे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन कुटुंबांना दिलासा दिला जाईल. ही घोषणा नागपूरनंतर आता चंद्रपूरमध्येही प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळत आहे.
27 जुलै ते 6 ऑगस्ट 2025 या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने 60 हरवलेल्या व्यक्तींचा यशस्वीरित्या शोध लावला. यामध्ये 24 पुरुष, 27 महिला, 2 अल्पवयीन मुले आणि 7 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. हे केवळ आकडे नाहीत, तर प्रत्येक आकड्यामागे एका नात्याचा पुनर्जन्म आहे. ही मोहीम केवळ शोध मोहिम नव्हे, तर अश्रूंना हास्यात रूपांतरित करणारा समाजमनाचा स्पर्श होता.
Indian Politics : सरसंघचालकांनी पंतप्रधान मोदींना दिला विनाशाचा इशारा
काटेकोरपणे राबवली मोहीम
राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस महासंचालक (महिला व बाल अपराध प्रतिबंध), मुंबई यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात 8 मिसिंग सेल स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक सेलमध्ये एक पोलीस अधिकारी आणि चार अंमलदार कार्यरत आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही मोहीम काटेकोरपणे राबविण्यात आली.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे अनेक कुटुंबांनी आपल्या हरवलेल्या सदस्यांना पुन्हा मिळवलं आहे. विशेष बाब म्हणजे सन 2020 आणि 2022 पासून बेपत्ता असलेल्या दोन महिलांचाही शोध घेण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आलं. इतक्या वर्षांनी हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटणे हा त्या कुटुंबासाठी पुनर्जन्मासारखा अनुभव होता. पोलिसांच्या प्रयत्नांनी नात्यांची वीण पुन्हा जुळवली गेली.
नव्या आशेचा किरण
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात ‘ऑपरेशन शोध’ जाहीर करताना म्हटले होते की, हे अभियान म्हणजे फक्त शोधमोहीम नव्हे, तर हजारो कुटुंबांच्या वेदनांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. त्या विधानाची पूर्णता चंद्रपूरच्या या यशाने दाखवून दिली आहे. ‘ऑपरेशन शोध’ ही मोहीम म्हणजे यंत्रणेला अधिक मानवी चेहरा देण्याचा आणि पोलिसी यंत्रणेवरचा जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचा एक प्रभावी टप्पा ठरतो आहे. जेव्हा एक हरवलेलं मूल आईच्या कुशीत परततं, तेव्हा तो क्षण फक्त त्या आईसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एका नव्या आशेचा किरण असतो.
ही मोहीम थांबलेली नाही. पुढच्या टप्प्यात आणखी हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी मोहिमा अधिक तीव्र, अधिक प्रभावी करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली. हे केवळ बातमीचे शब्द नाहीत, तर शोधलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाची स्पंदनं आहेत, जी पुन्हा त्यांच्या माणसांशी जोडली गेली आहेत.