विदर्भात पोलिसांवरील हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या निर्घृण हत्येने शहर हादरले असताना प्रशासनाच्या सुरक्षेच्या दाव्यांची विश्वासार्हता पुन्हा एकदा तपासली जात आहे.
चंद्रपूर शहरात पोलिस कर्मचाऱ्याच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असून, कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शुक्रवारी रात्री पठाणपुरा रोडवरील पिंक पॅराडाईज बीअर बारमध्ये किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले. पोलिस कर्मचारी दिलीप चव्हाण यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर त्यांचे सहकारी संदीप चापल गंभीर जखमी झाले.
मोटर परिवहन विभागात कार्यरत असलेले मृतक पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तातडीने पोलिसांनी कारवाई करत अक्षय शिर्के, नितेश जाधव आणि यश समुंद या तीन आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
चंद्रपूरसारख्या शहरात खुलेआम एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या होणे हे गंभीर चिंतेचे कारण आहे. पोलिस दलाच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, यावर नागरिकांनी आता सवाल उपस्थित केले आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षेचे उपाय अपुरे असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती अधिक बळावत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मद्यपींच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे पालन न झाल्यास अशा घटना वारंवार घडू शकतात. पोलिसांवरच हल्ले होऊ लागल्यास सामान्य नागरिकांनी स्वतःला सुरक्षित कसे समजावे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सुधारणा गरजेची
खुनाची घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेला एक मोठे आव्हान आहे. आरोपींना जलदगतीने अटक करण्यात आली असली तरीही अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय पावले उचलली जाणार आहेत, यावर प्रशासनाने खुलासा करणे आवश्यक आहे. शहरातील मद्यपी अड्ड्यांवर पोलिसांचा अधिक वचक असावा, अशा ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज आहे. तसेच, कायद्याच्या रक्षकांनाच जर जीव मुठीत धरून ड्युटी बजवावी लागत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल निर्माण झाला आहे.
चंद्रपूरकरामध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्था बळकट करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिस प्रशासनाने यापुढे अशा घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावले उचलावीत, याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे. चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही घटना केवळ एक पोलिस कर्मचाऱ्याची हत्या नसून संपूर्ण कायदा-सुव्यवस्थेच्या व्यवस्थेवर पडलेला गडद डाग आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.