भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी विजयावर भर देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, केवळ जिंकण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी मिळेल.
वर्धा येथे झालेल्या भाजपच्या विदर्भ विभागीय नियोजन मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणाने उत्साहाचे वातावरण तयार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर त्यांचे भाषण विशेष गाजले. कार्यकर्त्यांना काय मिळू शकते, याची माहिती देत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. आगामी निवडणुककींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचा संदेश देताना, बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, कार्य आणि विजयी क्षमतांवरच तिकिटांचे वितरण होईल.
कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जी झटपट केली आहे, त्याचे फळ आता मिळणार आहे. पक्ष त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार आहे. तुम्ही आमच्या निवडणुकीसाठी झटले, आता आमची वेळ आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची, असे संकेत त्यांनी आपल्या भाषणातून दिले.
विजयासाठी कार्यक्षमतेला तिकिट
समारोप प्रसंगी झालेल्या प्रमुख सभेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, मंत्री आकाश फुंडकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष संजय गाते, तसेच भाजपचे सर्व आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी जोरदार भाषण करत स्पष्ट संदेश दिला की, आगामी निवडणुकींमध्ये तिकिट केवळ त्यालाच मिळणार, जो विजयाची खात्री देईल. सध्या तिकीटासाठी सुरुवात झालेल्या हालचालींवर त्यांनी भाष्य करत, नातेवाईकांच्या शिफारसींच्या मागण्या चालू असल्याचे सांगितले. मात्र, यापुढे यशस्वी उमेदवारालाच तिकीट देण्यात येईल, ही पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
बावनकुळे यांनी सांगितले की, येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक होणार आहेत. सणासुदीचे 40 दिवस वगळल्यास प्रत्यक्ष प्रचारासाठी अवघे 22 दिवसच मिळतील. त्यामुळे आतापासून तयारी सुरू ठेवण्याचे त्यांनी सुचवले. या निवडणुकींनंतर तब्बल 762 विविध पदे आणि 140 मंडळांवरील स्थान भरले जाणार आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच ही संधी मिळेल. जन सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून पक्षाचे धोरण लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. अर्बन माओवादाच्या विरोधात उभारलेले जन सुरक्षा कवच ही पुढील पिढीसाठी रक्षण करणारी भिंत ठरणार आहे.
विकासाच्या योजनांना चालना
पक्षाने सुरू केलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत बावनकुळे यांनी सांगितले की, पांधन रस्त्यांच्या कामांसाठी 11 आमदारांची समिती गठित करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक पांधन रस्ता पूर्ण केला जाणार आहे. स्वामित्व कायदा देखील आणला जाणार आहे. कर भरल्याने किंवा रजिस्ट्री केल्याने मालकी मिळत नाही, तर ती केवळ सातबारा मिळाल्यानंतरच खरी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक फ्लॅटधारकाला हा हक्क देण्यात येईल, असे सांगत त्यांनी स्वामित्व हक्काचा मुद्दा नगरपालिका निवडणुकीत मांडण्याचे निर्देश दिले.
बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सलाम करताना म्हटले की, फडणवीस व मोदी सरकार सत्तेवर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत घेतली. रक्ताचे पाणी करून, खांद्याला खांदा लावून काम केले. पुढील निवडणुकीसाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना विजय मिळवून देण्यासाठी मेहनत घ्यायची आहे. सत्ता पुन्हा एकदा आपल्या हातीच येणार आहे, यावर विश्वास ठेवावा. या निवडणुकींमध्ये ‘सिकंदर होण्यासाठीच झुंज द्यायची आहे, अशा शब्दांत बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले.