उद्धव ठाकरे यांच्या चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर या टोला-गोळीला भाजपने स्फोटक प्रत्युत्तर दिलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना ‘खंडणीखोरांचा सरदार’ ठरवत भूतकाळातील ‘जिलेटीन’ प्रकरणाची आठवण करून दिली.
राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची सरमिसळ नवीन नाही, पण यावेळी भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद जणू ‘बॉम्ब ते बॉम्ब’ अशा स्तरावर पोहोचला. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महायुती सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून धारेवर धरत देवेंद्र फडणवीस यांना चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर, अशी उपमा दिली. ही उपमा भाजपच्या जिव्हारी लागली आणि लगेचच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना भूतकाळातील ‘जिलेटीन’ फाइल उघडून प्रत्युत्तराचा स्फोट घडवला.
उद्धवजी, खंडणीखोरांचा सरदार कोण आहे, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे, असा जळजळीत सवाल त्यांनी केला. बावनकुळे म्हणाले, उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेऊन शंभर कोटींची वसुली तुमच्या काळात झाली. वाझे प्रकरण लपवता येतं का? महाराष्ट्र विसरलेला नाही.
Vijay Wadettiwar : शिवरायांच्या महाराष्ट्रात सत्तेवर बसले कमिशनखोर
लोक विसरणार नाहीत
बावनकुळे यांची शब्दफेक याठिकाणी थांबली नाही. फडणवीसांवर आरोप करण्यापूर्वी आरशात पाहा. विधानसभा निवडणुकीत जनतेने आधीच दाखवून दिलंय की, कोण खऱ्या अर्थाने ‘चीफ’ आणि कोण ‘थीफ’. तुमच्या काळात लोकशाहीचा गळा घोटला गेला, नैतिकतेला पायाखाली तुडवलं गेलं. ते दिवस लोक विसरणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
महसूल मंत्री पुढे म्हणाले, इंडी आघाडीत तुमची किंमत शेवटच्या रांगेतील बाकड्याएवढीच आहे. दिल्लीतील मोठ्या आंदोलनाला न जाता इथे चार टाळके घेऊन आंदोलन केलं, पण धुरासारखं उडून गेलं. तिकडे राहुल गांधींचं आंदोलन गाजत असताना तुम्ही वेगळी चूल पेटवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचंही काही साध्य झालं नाही.
ठाकरेंना जनता कंटाळली
फडणवीसांच्या कामगिरीबद्दल बोलताना बावनकुळे ठामपणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणजे भ्रष्टाचारमुक्त, स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाचं प्रतीक. महाराष्ट्रातील जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. याउलट उद्धवजी, तुमच्यावर लोकांचा विश्वास उरलेला नाही. लोक तुमच्यापासून कंटाळले आहेत, हे सत्य आहे.
Nitin Gadkari : टॅरिफचे गणित सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे नवीन दृष्टीकोन
या सर्व वादाची पार्श्वभूमी सोमवारी उद्धव ठाकरेंनी दिलेली तीक्ष्ण टीका होती. तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, वरती तुमचे बापजादे बसलेत, तरी भ्रष्ट मंत्र्यांना काढण्याची हिंमत नाही. भाजपला अध्यक्षपदासाठी माणूस मिळत नाही, आणि तुम्हाला प्रामाणिक मंत्री मिळत नाहीत. दबावाखाली राहण्यापेक्षा भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा. नाहीतर दबाव इतका वाढेल की मग पळता भुई थोडी होईल, असा थेट इशारा ठाकरेंनी दिला.
विरोधकांचे आव्हान
ठाकरेंनी आणखी हल्ला चढवताना म्हटलं होतं, फडणवीसांना भ्रष्टाचार पटतोय की नाही, हे त्यांनी जाहीर करावं. नाहीतर दबाव झुगारून कारवाई करावी. काँग्रेसने त्यांना ‘थीफ मिनिस्टर’ हा शब्द दिला आणि आव्हान केले आहे की, फडणवीसांमध्ये जर स्वाभिमान असेल, तर त्यांनी दबाव बाजूला ठेवून कारवाई करावी.
पण भाजपने हा आरोप नुसता फेटाळलाच नाही, तर त्याचाच बूमरँग करून उद्धव ठाकरेंच्या भूतकाळातील वादग्रस्त प्रकरणांना उजाळा दिला. बावनकुळेंच्या या स्फोटक प्रत्युत्तरामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अजून तापणार, यात शंका नाही.
