नागपूरच्या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांना ठाम उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की मतदार संख्येतली वाढ ही लोकशाही प्रक्रियेचा नैसर्गिक भाग असून ती कधीही चोरी ठरू शकत नाही.
राज्याच्या राजकारणात मतदार यादी आणि निवडणुकींभोवती पुन्हा एकदा वादळ उठले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपाला भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठामपणे उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मतदार संख्येत झालेली वाढ ही प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे, ती कुठल्याही परिस्थितीत मतचोरी मानली जाऊ शकत नाही. निवडणुकीपूर्वी मतदार यादी प्रकाशित होते, त्यावर आक्षेप घेण्यासाठी कायद्याने वेळ दिला जातो. त्या टप्प्यावर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने हरकत घेतली नव्हती. सात महिन्यांनंतर मतचोरीचा आरोप करण्यास काहीही औचित्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे तब्बल 31 खासदार निवडून आले, तेव्हा विरोधकांकडून कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही. मात्र भाजपाच्या विजयाच्या ठिकाणीच विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येतो. ही विरोधकांची निवडक भूमिका असून मतदारसंख्या वाढणे ही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शक व नैसर्गिक बाब असल्याचा ठाम दावा त्यांनी केला.
Sameer Shinde : डिलिव्हरी बॉयच्या मूक वेदनांना शहर प्रमुख फोडणार वाचा
आगामी निवडणुकींसाठी आव्हान
बावनकुळे यांनी काँग्रेसला लक्ष्य करताना सांगितले की, येणाऱ्या महापालिका व नगरपालिका निवडणुकींसाठी मतदार यादी वेळेवर प्रसिद्ध होईल. तेव्हा काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना यादी तपासण्यासाठी कामाला लावावे. निवडणूक संपल्यानंतर आरोप-प्रत्यारोप करण्याची पद्धत लोकशाहीला शोभणारी नाही. त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचा दाखला देत सांगितले की, या ठिकाणी 17 हजार बूथवर नवीन फॉर्म भरून 34 हजार मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे मतांची वाढ म्हणजे गोंधळ किंवा गैरव्यवहार होत नाही, उलट ही लोकशाही बळकट होण्याची प्रक्रिया आहे. भाजप, शिवसेना आणि इतर घटक पक्षांमध्ये निवडणुकीदरम्यान काही मतभेद असले तरी महायुतीच्या छत्राखालीच निवडणूक लढवली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. घटक पक्षांमध्ये तणाव किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, अशा सूचना दिल्या असल्याचे ते म्हणाले. राज्यात स्थिरतेसाठी व विकासासाठी महायुतीची एकजूट टिकवणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महसूल मंत्र्यांनी आपल्या नावाने कोणी पैसे मागत असल्यास थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना केले. समाजमाध्यमांवर निकम नावाच्या व्यक्तीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही भ्रष्ट किंवा फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तीला सरकार कधीच आश्रय देणार नसल्याचा इशारा बावनकुळेंनी दिला. विदर्भात अलीकडील काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हीच सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.
Parinay Fuke : खेळ जिंकला खास, पण श्रेय महायुतीच्या नावावर पास
