
देशसेवेच्या नावाखाली सुरू झालेल्या यात्रांमध्ये खरी भावना कुणाची आणि नाट्य कुणाचं ? यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. नागपुरातून बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या ‘जय हिंद यात्रा’वर थेट राजकीय दिखावा असल्याचा आरोप केला.
देशभक्तीचा अमृतसंधान करणारी ‘तिरंगा यात्रा’ ही समाजासाठी समाजाने उभी केलेली प्रेरणादायी चळवळ आहे. या यात्रेमध्ये सर्व जाती, धर्म, आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. मात्र काँग्रेस पक्ष केवळ राजकारणासाठी ‘जय हिंद यात्रा’चे आयोजन करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य तिरंगा यात्रेदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसवर जोरदार शब्दबाण सोडले.

राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयापर्यंत पोहोचणाऱ्या या तिरंगा रॅलींची संख्या तब्बल दीड हजारांवर जाणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पुढे बावनकुळे म्हणाले, ही यात्रा कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. ती देशप्रेमाने भारलेली, समाजासाठी समाजाच्या पुढाकाराने उभी राहिलेली एक एकात्म चळवळ आहे. यात प्रत्येक जाती, धर्म आणि पक्षाचे लोक सहभागी झाले असून, ती खरी लोकशाहीची यात्रा आहे.
एकतेची साक्ष
पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देताना भारतीय लष्कराने दाखवलेला पराक्रम, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाची दखल केवळ देशातच नव्हे तर अमेरिकेच्या वृत्तपत्रांनीही घेतली आहे, असे सांगताना बावनकुळे म्हणाले, भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात घुसून दिलेला करारा प्रत्युत्तर हा संपूर्ण जगाने पाहिला. हे फक्त सैनिकांचे शौर्य नव्हे, तर भारताच्या अस्मितेचा झंकार आहे.
Nagpur : उपराजधानीच्या ग्रीन इमारतींना करसवलतीचा हिरवा सिग्नल
या तिरंगा यात्रेचे मूळ उद्दिष्ट म्हणजे देशवासीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि भारतीय सैन्याबद्दलचा अभिमान जागृत करणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, भारतीय लष्कर जो निर्णय घेईल, त्या निर्णयामागे संपूर्ण देश उभा राहील. ही यात्रा त्या ऐक्याची साक्ष आहे, असे बावनकुळे म्हणाले.
राजकारणाचा मुखवटा
काँग्रेस पक्षावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, ज्यांनी देशासाठी काहीही केले नाही, ते आता ‘जय हिंद यात्रा’ काढून देशप्रेमाचा आव आणत आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन करायला हवे होते. पण त्याऐवजी ते टीकेचा मार्ग पत्करत आहेत. त्यामुळे त्यांची यात्रा ही राजकीय आणि स्वार्थाधिष्ठित आहे, तर आमची यात्रा ही पूर्णपणे देशसेवेसाठी आहे.
ही यात्रा म्हणजे भारतमातेच्या चरणी श्रद्धांजली, देशसेवेचे व्रत आणि जनतेच्या ऐक्याची साक्ष आहे, असा ठाम विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. ही तिरंगा यात्रा आता फक्त आंदोलन नव्हे, तर लोकशक्तीचा उत्सव बनली आहे. देशभक्तीची लहर सर्वदूर पसरवत, समाजासाठी समाजाने काढलेली ही यात्रा खर्या अर्थाने भारताच्या आत्म्याला साजेशी आहे.