महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : पटोलेंच्या ऑफरवर बावनकुळे यांची टोमणेबाज पिचकारी

BJP : सत्तेच्या मागे धावणे सोडा आधी जबाबदारी पार पाडा

Post View : 20

Author

नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. म्हणजेच सत्तेचा रंग बदलवा आणि मुख्यमंत्रीपद मिळवा, असे पटोले यांचे म्हणणे होते. परंतु महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठवले यांच्या ऑफरवर पिचकारी मारत टोला लगावला आहे. 

होळीचा सण रंगाचा असला तरी यंदा राजकीय रंगही तितकाच गडद झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी एक धक्कादायक विधान करत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर दिली, यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांना प्रत्युत्तर दिल आहे.

पटोले यांच्या मते, दोघांमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात एका नेत्याला काही दिवस आणि दुसऱ्याला काही दिवस मुख्यमंत्री करण्याचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. भाजपच्या पाठिंब्याने हे दोघेही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला. पटोले म्हणाले होते, जर वेळ आली, तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा दिसत आहे. अशा परिस्थितीत आम्ही दोघांनाही आलटून-पालटून मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole : रंग बदलाल तर मुख्यमंत्री व्हाल; शिंदे-पवारांना ऑफर

जबाबदारी पार पाडा

नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांना टोमणावजा सल्ला देत, त्यांनी विरोधी पक्ष म्हणून जबाबदारीने काम करावे, असा संदेश दिला.

पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, होळीच्या दिवशी नाना पटोले यांना एक चांगला सल्ला देतो. विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडा. पाच वर्ष चांगले काम करा, जनतेचा विश्वास कमवा आणि मग सत्ता मिळवण्याचा विचार करा. जनतेसमोर उत्तम परफॉर्मन्स द्या, हेच त्यांच्यासाठी योग्य राहील.”

ऑफर्सला महत्त्व नाही

बावनकुळे पुढे म्हणाले, “महायुतीतील कुठलाही नेता अशा ऑफर्सना गांभीर्याने घेत नाही. महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाचा आमचा संकल्प आहे. आम्ही विकासाच्या दिशेने काम करत आहोत आणि अशा राजकीय चर्चांमध्ये वेळ घालवत नाही. बावनकुळेंनी पुढे विरोधी पक्षाला सल्ला देत म्हटले, विरोधी पक्षाने सरकारला चांगल्या सूचना द्याव्यात, विकासात मदत करावी. आज होळीच्या दिवशी, राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्रित यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

नाना पटोले यांच्या विधानानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सत्ता वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याच्या बातम्या यापूर्वीही आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या या नव्या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!