नागरिकांचे प्रश्न ऐकण्यासाठी आणि त्यावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः समोर आले, जनसंवाद कार्यक्रमात दोनशेहून अधिक तक्रारी, समस्यांवर थेट सुनावणी आणि प्रशासनाला कडक आदेश.
नागरिकांच्या तक्रारी, अपेक्षा आणि अडचणी थेट ऐकण्याकरिता आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला जागं करण्यासाठी आज नियोजन भवन येथे एक महत्त्वपूर्ण ‘जनसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला पालकमंत्री आणि राज्याचे राजस्वमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकले. त्यांनी प्रशासनातील संबंधित विभाग प्रमुखांना थेट सूचना देत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. जनतेच्या अडचणी ऐकताना त्यांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्या सोडवण्याच्या दिशेने प्रामाणिकपणे पावले उचलली.
या जनसंवाद कार्यक्रमात तब्बल 207 नागरिकांनी विविध स्वरूपाच्या समस्या आणि निवेदने सादर केली. त्यात आरोग्य सुविधा, वीज वितरणातील अडचणी, आंगणवाडी केंद्रांची परिस्थिती, कृषी समस्यांपासून ते अतिक्रमण, क्रीडा सुविधा आणि विविध शासकीय योजना लाभाबाबत अनेक प्रश्न समोर आले. महिलांपासून वृद्धांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून दिव्यांग व्यक्तींना या संवादातून आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाली.
विलंब न करता निर्णय
पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रत्येक समस्येला गांभीर्याने घेतले. त्यांनी सांगितले की, “प्रशासनाला जनतेच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन तात्काळ तोडगा काढावा लागेल. खास करून आरोग्याशी संबंधित समस्यांवर विलंब न होता त्वरेने निर्णय घ्या. यासंबंधी सादर करण्यात आलेल्या सर्व ज्ञापनांची पुढील बैठकीत आम्ही पुनरपरीक्षा करू.
कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि इतर विभाग प्रमुखांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सरकारी योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. कोणतीही फाईल लटकवू नका, पात्र लाभार्थ्यांचे काम नियमानुसार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे. या कार्यक्रमातून एक स्पष्ट संदेश दिला गेला की, राज्य शासन नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे आणि पालकमंत्री स्वतः या प्रक्रियेचे नेतृत्व करत आहेत. जनतेचे सरकार म्हणून त्यांच्या समस्या ऐकून तात्काळ निर्णय घेणे हीच खरी लोकशाही आहे, असे ठामपणे या कार्यक्रमातून दिसून आले.
अधिक कार्यक्षम
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नेतृत्व ही आता केवळ एक औपचारिक भूमिका नसून, ते जनतेच्या विश्वासाचे खरे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. जनसंवाद कार्यक्रमातून आलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रशासनाला दिलेले स्पष्ट आदेश हे त्यांच्या कार्यशैलीचे सशक्त उदाहरण ठरले. अशा प्रकारचे लोकाभिमुख उपक्रम सातत्याने होत राहावेत आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनवून जनतेच्या तक्रारींवर त्वरित उपाययोजना व्हावी, अशी जनतेतून भावना व्यक्त करण्यात आली.