कोराडीतील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक नाविन्यपूर्ण कलमकारी गारमेंट क्लस्टर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली 5 कोटी रुपयांची तरतूद करून स्वावलंबनाच्या संधी दिल्या जाणार आहेत.
कोराडी येथील आदिशक्ती श्री महालक्ष्मी देवी संस्थानाच्या पवित्र परिसरात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार आहे. स्वयंरोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी आणि स्थानिक महिलांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणण्यासाठी एक अभिनव प्रकल्प आकार घेत आहे. राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीने प्रेरित हा उपक्रम कोराडी येथे साकारणाऱ्या कलमकारी गारमेंट क्लस्टरच्या रूपाने प्रत्यक्षात येत आहे. या प्रकल्पासाठी नियोजन भवन येथील आढावा बैठकीत 5 कोटी रुपयांचा नाविण्यपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना केवळ रोजगारच नव्हे, तर त्यांच्या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत स्वदेशी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचे स्वप्न साकारले जाणार आहे. खादी, सूती आणि कॉटनवर आधारित कलमकारी कलेतून साकारलेल्या वस्त्रांना देश-विदेशात वाढती मागणी आहे. या संधीचा लाभ घेत कोराडीतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरणार आहे.
प्रदूषणमुक्त गारमेंट क्लस्टर
कोराडी येथील या गारमेंट क्लस्टरची रचना पर्यावरणपूरक आणि टिकाऊ पद्धतीने करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महिलांना हस्तकला आणि वस्त्रनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी एन.डी. जेम्स या संस्थेची निवड करण्यात आली आहे. कोराडी मंदिर परिसरातील प्रशस्त सभागृहात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे, जिथे सुमारे 200 महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. येथे हॅन्ड ब्लॉक प्रिंटिंगद्वारे पारंपरिक डिझाइन्स नैसर्गिक रंगांनी वस्त्रांवर उतरवली जाणार आहेत. यासाठी अत्याधुनिक शिलाई यंत्रे, कटिंग टेबल्स, वॉशिंग युनिट आणि 10 टन वजनाचे पिगमेंट प्रिंटिंग मशिन यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य केवळ वस्त्रनिर्मितीपुरते मर्यादित नाही. कोराडी येथील मंदिर परिसरात निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्यापासून ते लोकर आणि सुतापासून गालिचे बनवण्यापर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय, सेंद्रिय वस्तूंची निर्मिती, गोपालन आणि गोमूत्रापासून जीवामृत तयार करण्याचे प्रशिक्षणही महिलांना दिले जाणार आहे. या सर्व उपक्रमांचे उद्दिष्ट ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक बाजारपेठेची जोड देणे आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) या प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. माविमच्या माध्यमातून महिलांना कौशल्य प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास निर्मिती यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. याशिवाय, या प्रकल्पांतर्गत निर्मित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र मॉल आणि विक्री केंद्राची उभारणीही प्रस्तावित आहे. यामुळे स्थानिक महिलांना केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे.
