राजकारणात एक म्हण आहे. ‘जे बोलतं, ते चालतं’. पण वडेट्टीवारांचं बोलणं एवढं जास्त झालं की बावनकुळे म्हणाले, ‘हे विरोधी नेते नाहीत, आंतरराष्ट्रीय स्पीकर्स आहेत. आता असं म्हटलं की विषयच संपला. वडेट्टीवार दररोज नवा बॉम्ब टाकतात आणि बावनकुळे त्यांच्या खास शैलिक उत्तर देतात. हे दोघं बोलले की, माईक गरम आणि प्रेक्षक फुल एंटरटेन.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलंच फटकारलं आहे. वडेट्टीवारांवर बोचरी टीका करताना बावनकुळे यांनी त्यांना ‘आंतरराष्ट्रीय विरोधी नेते’, अशी उपाधीच बहाल केली. वडेट्टीवार यांना फक्त बोलायचं असतं, म्हणून बोलतात. मनात काहीतरी वेगळंच असतं आणि तोंडून काहीतरी वेगळंच, असं म्हणत बावनकुळे यांनी वडेट्टीवारांची खरडपट्टी काढली.
बावनकुळे 10 एप्रिल गुरुवारी अमरावती दौऱ्यावर होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व तनिषा भिसे प्रकरणावर वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा झाली असता, बावनकुळे यांनी आपल्या खास शैलीत वडेट्टीवारांना चपराक दिली. मी अमरावतीच्या विकासासाठी आलोय, त्यामुळे मला या ‘आंतरराष्ट्रीय नेत्यां’बद्दल विचारू नका. असा मिश्कील टोला लगावत त्यांनी या विषयावर फार बोलणं टाळलं.
मंगेशकर कुटुंबावर टीका
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि मंगेशकर कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. वडेट्टीवारांनी थेट म्हटलं, मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंचा टोळा आहे. लतादीदी, आशादीदी सगळ्यांनी फक्त गाणी गायली, पण देशासाठी काय केलं? त्यांना जमिनी मिळाल्या, लोकांनी जयजयकार केला, पण मानवतेसाठी काही केलं का? खिलारे पाटलांनी दिलेली जमीन देखील त्यांनी परत दिली नाही. हे सगळं मंगेशकर कुटुंबावर एक धब्बा आहे, यावर बावनकुळे यांनी पलटवर केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “वडेट्टीवार आणि संजय राऊत हे दोघंही आंतरराष्ट्रीय दर्जाचे विरोधी नेते आहेत. भारतात काय घडलं, ते सांगायचं आणि उत्तरही स्वतःच द्यायचं. एवढाच त्यांचा व्यवसाय आहे, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊत आणि वडेट्टीवार या नेत्यांची खिल्ली उडवली. बावनकुळे पुढे म्हणाले, यांना रोज काही ना काही बोलायचं असतं. एक दिवस रुग्णालयावर, दुसऱ्या दिवशी पुतळ्यावर, तिसऱ्या दिवशी कुणाच्या गाण्यावर टीका करतात. हे लोक आता विरोधासाठीच जन्माला आले आहेत असं वाटतं.
विकासावर बोला, वादावर नाही
बावनकुळे यांनी यावेळी अमरावतीच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं. “माझं काम म्हणजे विकास करणे. वडेट्टीवारांचं काम म्हणजे वाद निर्माण करणे. त्यामुळे मी काय करतो, त्यावर बोला. बाकी त्यांच्या खाजगी मतांबद्दल मी वेळ वाया घालवत नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
राजकारणात टीका-टिप्पणी नवी नाही, पण वडेट्टीवारांच्या मंगेशकर कुटुंबावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने वातावरण तापवलं आहे. त्यावर बावनकुळे यांनी मिश्कील आणि धारदार शैलीत प्रत्युत्तर देत विरोधकांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. आता पाहावं लागेल, वडेट्टीवार यावर काय ‘आंतरराष्ट्रीय’ उत्तर देतात!
