महाराष्ट्र

Nagpur : देवाभाऊंच्या गृह नगरात विकासाला लागला ‘रेड सिग्नल’

Chandrashekhar Bawankule : प्रगतीचे इंजिन सुरळीत फिरायला पालकमंत्र्यांनी घेतली दखल

Author

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगरपालिकेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरात नागरी सुविधा पुरविण्याच्या कामांची सखोल आढावा बैठक घेण्यात आली.

महाराष्ट्राची उपराजधानी, जिचे अनेक टोपण नावे आहेत. संत्र्यांचे शहर, मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी अशी ओळख असलेले नागपूर शहर. हे शहर केवळ महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयातही विशेष स्थान राखते. त्यांचे गृह नगर असल्यामुळे नागपूरचा विकास नेहमीच झपाट्याने होतो. पण सध्या या विकासाच्या मार्गात काही अडथळे उभे राहिल्याचे संकेत दिसून येत आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या कामकाजाच्या वार्षिक समीक्षा बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंदाच्या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या निधीचा मोठा हिस्सा न वापरल्याबद्दल गंभीर नाराजी व्यक्त केली.

310 कोटी रुपयांच्या या निधीचा उद्देश नागपूरच्या विकासाला गती देणे हा होता. पण अद्याप मनपाकडून या निधीचा उपयोग करण्यासाठी आवश्यक प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठवलेला नाही. यामुळे नागपूरचा विकासाच्या प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी मनपा प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला की, नागपूरसाठी मंजूर केलेल्या निधीचा प्रभावी आणि वेळेवर उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. विकासाच्या कामासाठी निधी मंजूर आहे, पण तो वापरावा लागेल. प्रस्ताव वेळेत पाठवणे हा आपला पहिला कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

निर्णयांचे काटेकोर पालन

बावनकुळे यांनी याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की कामांचे प्रस्ताव त्वरित तयार करून शासनाकडे पाठवावे. नाहीतर नागपूरच्या प्रगतीचा वेग मंदावेल. नागपूर महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या नियोजन विभागात सध्या ‘विजन 2023’ महत्त्वाकांक्षी योजनेवरही चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महानगरपालिकांकडून लोकसंख्येच्या वाढीला तोंड देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मात्र, 12 ऑक्टोबर 2024 रोजी सूचना देण्यात आल्या असूनही, नागपूर महानगरपालिकेने अजूनही हा प्रस्ताव सरकारकडे सादर केलेला नाही. यावरही पालकमंत्र्यांनी गंभीर लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांच्यासोबत आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे आणि नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी नागपूरच्या विकासासाठी सरकार आणि मनपा यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला. नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराचा विकास झपाट्याने होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हे शहर केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. नागपूरच्या नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, तसेच शहराच्या विविध सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास गतीने पुढे जावा यासाठी या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय आणि दंडात्मक नोटा काळजीपूर्वक अंमलात आणणे आवश्यक आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!