
मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या दीर्घकालीन संघर्षाला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताज्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या ठाम विधानाने राजकीय वर्तुळात नवा हलकल्लोळ उडवला आहे.
महाराष्ट्राचा विकास होणार असेल, तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच शक्य आहे. असं स्पष्ट सांगणारे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान करत वातावरण तापवलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा प्रश्न उभा राहतो आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. या विजयात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आणि पुन्हा एकदा आपलं बळ सिद्ध केलं. मात्र, निवडणुकीनंतर सुरू झालेलं राजकीय नाट्य अद्यापही थांबलेलं नाही. शपथविधीपासून ते मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत महायुतीत मानापमानाचे अनेक प्रसंग घडले.

एका जाहीर सभेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विकसित महाराष्ट्राचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मांडला आहे. तो संकल्प पूर्ण करायचा असेल, तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच गरज आहे. त्यामुळे 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, यात शंका नाही. बावनकुळे पुढे म्हणाले की, डबल इंजिन सरकार म्हणजे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे हित साधू शकते. या विधानामुळे भाजपच्या अंतर्गत नेतृत्वावरची चर्चा आणि महायुतीतील अस्वस्थता याला पुन्हा एकदा खतपाणी मिळालं आहे.
महायुतीतील अंतर्गत संघर्ष
पालकमंत्री पदावरून सुरू झालेली नाराजी आजही शमलेली नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी कोण सोडत नाही, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेलं शीतयुद्ध अजूनही विरलेलं नाही, आणि ते वेळोवेळी डोकं वर काढतंय. महायुतीतील सौहार्दाच्या पडद्यामागे सत्ता-संघर्षाचं नाट्य रंगताना पुन्हा एकदा दिसलं, जेव्हा अमरावतीतल्या विमानतळ लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडवली होती. याआधी पायलट मी होतो, आणि को-पायलट फडणवीस होते.
शिंदेंचं हे एक साधं विधान न राहता, राजकीय संकेतांचा ब्लॅक बॉक्स उघडून गेलं. सत्तेच्या कॉकपिटमध्ये कोण खरा कॅप्टन आणि कोण फक्त को-पायलट? हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन तात्काळ काश्मीरला रवाना झाले. त्यांच्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे पोहोचले. या घडामोडींमुळे श्रेयवादाच्या चर्चांना उधाण आलं. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, पर्यटकांना सुरक्षित आणण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न जर कोणाच्या मते श्रेयवाद असतील, तर ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
Chandrashekhar Bawankule : पाण्याच्या थेंबासाठी शाश्वत नियोजनाची तयारी
गंभीर प्रकरणांवर राजकारण करणं योग्य नाही. त्यांनी सर्वच पक्षांना या राष्ट्रीय संकटात एकत्र येण्याचे आवाहनही केलं. राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजपा नेतृत्त्वाने पुन्हा एकदा फडणवीस यांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र महायुतीतील इतर घटक पक्ष या विधानांवर कशी प्रतिक्रिया देतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.