चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे नागपूर जिल्ह्यातील समाजकल्याण निधीला अखेर मंजुरी मिळाली. यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या विकास योजनांना गती मिळणार आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला निधी अखेर मंजूर झाला आहे. महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा निधी समाजकल्याण विभागाच्या हाती आला आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या नागरिकांसाठी चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा होता.
राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मंजुरीअभावी 2017 ते 2022 दरम्यान झालेल्या विविध विकासकामांसाठी 7 कोटी 9 लाख 26 हजार रुपयांचा निधी रखडलेला होता. हा निधी मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, मात्र त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा विषय गांभीर्याने घेत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा करून निधीला मंजुरी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले व सामाजिक न्याय विभागाने अखेर निधीला मंजुरी दिली आहे.
मंजुरीमूळे मार्ग मोकळा
निधी मंजूर झाल्याने जिल्ह्यातील समाजकल्याण योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या उत्थानासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध विकासकामांना आता गती मिळणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार व मूलभूत सुविधा यांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने या निधीच्या वितरणाची तयारी सुरू केली आहे, ज्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील अनेक विकास प्रकल्प वेगाने मार्गी लागतील.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सतत संवाद साधत निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केला. गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी हा मुद्दा त्यांच्या समोर मांडला. त्यांनी त्वरित सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आणि अखेर हा निधी मंजूर करण्यात आला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना आता विकासाच्या योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
Vijay Wadettiwar : मोदींना अखेर आरएसएसच्या आधाराची गरज भासली
प्रशासनाची तत्परता
निधी मंजुरीनंतर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. या निधीमुळे ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी पायाभूत सुविधा, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार योजना, तसेच विविध सामाजिक प्रकल्पांची अंमलबजावणी शक्य होणार आहे. प्रशासनाने या निधीचा योग्य प्रकारे उपयोग करून समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी प्रभावी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निधीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल. हे केवळ आर्थिक सहाय्य नाही, तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भविष्य उज्ज्वल दिसत आहे.