हनीट्रॅप प्रकरणावरून आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या विरोधकांकडे एकही ठोस पुरावा नाही, असा जोरदार दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते, जिथे त्यांनी विरोधकांच्या टीआरपीच्या राजकारणावर थेट घणाघात केला.
राजकारणात टीआरपीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. सध्या हनीट्रॅप प्रकरणाच्या नावाखाली शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसकडून फेक आरोपांचा डोंगर उभारला जातोय, पण त्यामागे एकही ठोस पुरावा नाही. यावर थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना कडक शब्दांत टीका करत विरोधकांचा खोटेपणाचा मुखवटा फाडला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जर विरोधकांकडे खरोखर काही ठोस माहिती असती, तर ती त्यांनी आतापर्यंत विधानसभेत मांडली असती किंवा पत्रकार परिषद घेऊन उघड केली असती. पण त्यांच्याकडे काहीच नाही. फक्त अफवा पसरवून जनतेला गोंधळात टाकायचं आणि आपली राजकीय टीआरपी वाढवायची, हेच सध्या सुरू आहे.
काँग्रेस नेत्यांच्या बाजूने
बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. संजय राऊत जे बोलत आहेत, ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोलेंच्या बाजूने अधिक वाटतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडली आहे. तरीही विरोधक केवळ गोंधळ घालण्याचे काम करत आहेत. ज्यांच्याकडे खरंच काही पुरावे असतात, ते एका क्षणात ते समोर आणतात. पण हे लोक फक्त आवाज करतायत, कारण त्यांच्याकडे काहीच नाही, असा घणाघात बावनकुळेंनी केला.
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, एखाद्याशी नातं असणं म्हणजे काय आपण गुन्हा केला, असं समजायचं का? माझेही अनेकांशी संबंध आहेत, पण त्यामुळे मी काही चुकीचं केलं, असं होत नाही. खडसेंनी वारंवार गिरीश महाजन यांच्यावर आरोप करणं बंद करावं, कारण यातून फक्त वैयक्तिक आकस दिसून येतो. विरोधक फक्त आरोप करत आहेत, जबाबदारी घेत नाहीत, असा पलटवार करत बावनकुळेंनी शाब्दिक फटकेबाजी केली. त्यांनी कोणताही मुद्दा सोडला नाही. हनीट्रॅपच्या नावाने राजकीय नाट्य रचणाऱ्या विरोधकांना आज चांगलीच सडेतोड उत्तरं मिळाली आहेत.
High Court : बॉम्ब फुटले, न्याय उधळला; बावनकुळे म्हणतात, लढाई संपलेली नाही
स्पष्ट इशारा
सध्या विरोधक ‘हनीट्रॅप’ नावाखाली जनतेचं लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जबाबदारीचं भान राखत, मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळाने स्पष्ट भूमिका मांडली असून खोटं बोलून राजकारण करण्याचा काळ आता संपला आहे, असा स्पष्ट इशाराच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ज्यांचं खरं असतं, ते कधीच ओरडत नाहीत आणि जे ओरडतात, त्यांच्याकडे खरं काहीच नसतं. हा संदेश विरोधकांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही.