
महाराष्ट्र विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून प्रचंड गोंधळ झाला. यामुळे गोंधळ वाढत गेल्याने अखेर विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करावी लागली.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेब समर्थक वक्तव्यावरून वातावरण चांगलेच तापले. सत्ताधारी पक्षाने त्यांच्या तात्काळ निलंबनाची जोरदार मागणी केली. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील या वादामुळे अखेर विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी या मुद्द्यावर निवेदन देण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच वेळी सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी केली आणि गोंधळ निर्माण केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी परिस्थिती निवळवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. पण गोंधळ वाढत गेला, त्यामुळे अखेर संपूर्ण दिवसासाठी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
एकनाथ शिंदे संतापले
विधानसभेत प्रश्नांची चर्चा सुरू होण्याआधीच गदारोळ झाला. भाजप आणि शिंदे गटाने आझमी यांच्या विधानाचा कडाडून विरोध केला. त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. यामुळे सभागृहात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, आमदार अतुल भातखळकर आणि मंत्री उदय सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते आझमी यांच्या वक्तव्यावर संतप्त झाले होते.
विरोधी बाकांवरून देखील काही आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, संपूर्ण सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. विधानसभा गटनेते भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी मिळाली असता, सत्ताधारी आमदारांनी अधिकच गोंधळ घातला.
अर्थसंकल्पावर परिणाम
यावर्षीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. महाराष्ट्र सरकार महागाई, बेरोजगारी, कृषी धोरणे आणि विकास योजनांवर मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, राजकीय गोंधळामुळे या महत्त्वाच्या चर्चांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे राजीनामा प्रकरणावर महाराष्ट्राचं राजकारण तापलेले आहे.
महाराष्ट्रासाठी हे अधिवेशन निर्णायक ठरणार आहे. कारण सरकारने अनेक विकास योजना जाहीर केल्या आहेत, ज्या सध्या अंमलबजावणीच्या टप्प्यात आहेत. मात्र, विरोधी पक्ष हे अधिवेशन सरकारच्या धोरणांवर टीका करण्यासाठी वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये विधानसभा अधिकच रणभूमी बनण्याची चिन्हे आहेत.
अधिवेशन तापणार
महाराष्ट्राच्या राजकारणात आता या घटनेमुळे अधिक तापलेल्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे विधासभेत हा मुद्दा तापला असतांना, दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनामा प्रकरणावर सर्वत्र चर्चा सुरु आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या धोरणांवर चर्चा होण्याऐवजी राजकीय गोंधळ अधिकच वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपांची लढाई पाहायला मिळेल.