महाराष्ट्र

Bhandara : वाघमारेंचे लागले ‘चरण’ अन् टळले राष्ट्रवादीचं मरण

Charan Waghmare : शरद पवारांसोबत येताच पक्षाला नवी ऊर्जा

Share:

Author

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी फूट पडली. त्यानंतर शरद पवारांचा गट कवमुकवत झाला. आता या गटाचं भंडाऱ्यातील मरण टळलं आहे.

महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडली. अजित पवारांनाही सत्तेत सहभागी करून घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीनंतर शरद पवारांचा पक्ष अनेक ठिकाणी कमकुवत झाला. विदर्भातील अनेक नेते अजितदादांसोबत निघून गेले. अशा परिस्थितीत भारत राष्ट्र समितीमधून माजी आमदार चरण वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चरण वाघमारे यांनी यांनी महायुतीला जबरदस्त टक्कर दिली. शरद पवार यांच्या पक्षाची मोट त्यांनी पुन्हा बांधली.

विधानसभा निवडणुकीत चरण वाघमारे यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत झाली. राजू कारेमोरे यांना त्यांनी ‘टफ फाइट’ दिली. वाघमारे यांचा निवडणुकीत पराभव झाला. परंतु त्यांनी 71 हजार 508 मतं घेत दुसरा क्रमांक मिळविला. कारेमोरे आणि वाघमारे यांच्या मतांमध्ये 64 हजार 305 एवढा फरक होता. परंतु आपल्याला संधी मिळाल्यास हे 64 हजारही आपल्याकडं खेचू शकतो, असा विश्वास त्यांनी शरद पवारांना दाखवून दिला. त्यामुळं आता पवारांनी आपल्या पक्षाची धुरा वाघमारे यांच्याकडं सोपविली आहे. चरण वाघमारे यांना भंडारा राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष करण्यात आलं आहे.

मल्लीकार्जुन खर्गे यांच्या विधानाचा Parinay Fuke यांनी घेतला समाचार

तुमसरमध्ये प्रभाव

माजी आमदार चरण वाघमारे यांचा तुमसर-मोहाडी मतदारसंघात आजही प्रभाव आहे. भंडारा जिल्हा परिषदेतही त्यांची बऱ्यापैकी पकड आहे. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तेलंगणातील भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. मात्र तेलंगणातच बीआरएसची कार मतदारांनी पंक्चर केली. त्यानंतर 13 ऑक्टोबर 2024 रोजी वाघमारे बीआरएसमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आलेत. पक्षात येताच त्यांना शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची उमदेवारी दिली. चरण वाघमारे बीआरएसमध्ये गेल्यानंतर त्यांचं राजकीय अस्तित्व संपलं अशी टीका विरोधकांनी सुरू केली. पण वाघमारे यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीतून चरण वाघमारे यांनी आपलं राजकीय वर्चस्व आजही कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळंच आता चरण वाघमारे यांच्यावर शरद पवार यांनीही विश्वास दाखविला आहे. त्यामुळं भंडाऱ्याच्या राष्ट्रवादीत वाघमारेंचे चरण लागताच पक्षाचं संभाव्य मरण टळलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रस्थापितांपुढंही आव्हान निर्माण झालं आहे. वाघमारे यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता त्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळालं आहे. त्यामुळं भंडाऱ्यात पुन्हा एकदा पवार गटाची ताकद वाढेल असं मानलं जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!