राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. ज्यासाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागलेला आहे. भंडारा जिल्ह्यातही नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते त्यांच्या रणनीतींना अंतिम रूप देण्यासाठी हालचाली सुरू करत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे ढग दाटून येत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने तब्बल सहा वर्षांनंतर महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वत्र उत्साह संचारला आहे. भंडारा जिल्ह्यातही ही लढाई जोरात रंगत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नगरपरिषदांवर प्रशासक राज आहे. निवडणूक न झाल्याने नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणीच पुढे येत नाही, असा आरोप होत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुढाकार घेत भंडाऱ्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक भव्य जनसुनावणी आंदोलन आयोजित केले आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे. भंडारा शहरातील प्रत्येक नागरिकाला आपल्या समस्या मांडण्याची संधी देण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेवर प्रशासक राज असल्याने नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. रस्त्यांची दुरवस्था, गटारींची अस्वच्छता, लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा, कामगारांना मिळत नसलेले दाखले, घरकुल योजनेचे रखडलेले प्रस्ताव, फेरफार न झालेली कागदपत्रे, अवाजवी घरपट्टी कर आदी अनेक समस्यांनी भंडारा शहरातील नागरिक त्रस्त आहेत.
IPS Archit Chandak : ‘मोक्का’च्या जाळ्यात अडकला अकोल्याचा डॉन
महाविकास आघाडीची रणनीती
संपूर्ण समस्यांना वाचा फोडण्यासाठी चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भंडारा नगरपरिषद कार्यालयासमोर जनसुनावणी आणि आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.या जनसुनावणीच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या तक्रारी थेट मांडता येणार आहेत. चरण वाघमारे यांनी यापूर्वीही आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने भंडारा जिल्ह्यातील जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे. विशेषतः सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. या आंदोलनात इतर मान्यवरही उपस्थित राहणार असून, तहसील कार्यालय आणि नगरपरिषदेशी संबंधित सर्व समस्यांचा जागीच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भंडारा शहरातील प्रत्येक नागरिकाला या जनसुनावणीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांचे प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होईल.भंडारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर भारतीय जनता पक्ष (भाजप) सातत्याने आघाडीवर राहिला आहे. मात्र, यंदा महाविकास आघाडी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने भंडारा नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. या जनसुनावणीच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या निवडणुकीत भंडारा नगरपरिषदेवर कोणाची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाघमारे यांच्या या आंदोलनाने निवडणुकीपूर्वीच भंडाऱ्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन चरण वाघमारे यांनी भंडारा शहरवासीयांना केले आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या जनसुनावणीमुळे भंडाऱ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.